ऑस्कर मिळाल्यानंतर गुनीत मोंगा झाल्या होत्या रुग्णालयात दाखल, 'बोलू दिलं नाही म्हणून...'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2023 08:42 AM2023-03-26T08:42:02+5:302023-03-26T08:43:40+5:30
'द एलिफंट व्हिस्परर्स' या माहितीपटाने सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्मचा पुरस्कार पटकावला.
'द एलिफंट व्हिस्परर्स' (The Elephant Whisperers) या माहितीपटाने यंदा ऑस्कर पुरस्कार जिंकत भारताचे नाव उंचावले. माहितीपटाच्या निर्मात्या गुनीत मोंगा (Guneet Monga) आणि दिग्दर्शिका कार्तिकी गोंजाल्विस यांनी स्टेजवर जाऊन पुरस्कार स्वीकारला. मात्र यानंतर त्यांना बोलू दिले नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली होती. नुकतेच 'नाटू नाटू' चे संगीतकार एम एम कीरावानी (MM Kirawani) यांनी दिलेल्या माहितीनुसार गुनीत मोंगा यांना ऑस्कर सोहळ्यानंतर रुग्णालयात दाखल करावे लागले.
'एम एम कीरावानी' यांनी नुकतेच एका मुलाखतीत सांगितले, 'ऑस्कर जिंकल्यानंतर आनंदी होणं स्वाभाविकच आहे. पण इतकंही उत्साही नाही झालं पाहिजे. ऑस्कर पुरस्कार मिळाल्यानंतर गुनीत मोंगा यांना बोलू दिलं नाही. नंतर त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं.'
तर गुनीत मोंगा यांनी बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, 'मला ऑस्करमध्ये भाषण करण्याची संधी दिली नाही. याचा मला धक्का बसला होता. भारतीय निर्माती असलेला हा पहिलाच ऑस्कर होता. ही फार मोठी गोष्ट आहे. मी इतकी दूर येऊ शकले पण माझं कोणीच ऐकू शकणार नव्हतं. मी तिथे पुन्हा जाईन आणि माझं म्हणणं मांडेन याची खबरदारी घेईन.'
यंदाचा ऑस्कर पुरस्कार भारतीयांसाठी खास ठरला. 'द एलिफंट व्हिस्परर्स' या माहितीपटाने सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्मचा पुरस्कार पटकावला. तमिळनाडूतील एका आदिवासी जोडप्याने दोन हत्तींचा अगदी लहान बाळाप्रमाणे सांभाळ केला त्यांना जीवदान दिलं अशी ती गोष्ट आहे.