Amitabh Bachchan, Raj Thackeray: 'अमिताभ बच्चन नावाचं अग्निकुंड कायम धगधगत राहो'; राज ठाकरेंचे खास पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 06:32 PM2022-10-11T18:32:10+5:302022-10-11T18:33:57+5:30
अमिताभ यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त राज यांनी एक पत्र लिहिले आहे.
Amitabh Bachchan Birthday, Raj Thackeray: बॉलिवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन हे आज आपला ८०वा वाढदिवस साजरा करत आहेत. अमिताभ बच्चन यांना कुणी ‘अँग्री यंग मॅन’ म्हणतं तर कुणी ‘सुपरमॅन ऑफ द सेंच्युरी’ म्हणतं. बिग बी सध्या वयाच्या तिसऱ्या इनिंग्समध्ये आहेत, पण त्यांचा उत्साह आजकालच्या तरुणांना लाजवेल असा असतो. आजही ते बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारताना दिसत आहेत. अशा या महानायकाला सर्वच स्तरातून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात येत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही खास त्यांच्या शैलीत एका पत्राद्वारे अमिताभ यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
राज ठाकरेंनी पत्रात काय लिहिलं...
असं म्हणतात, प्रत्येक दशकाचा एक नेता असतो, एक अभिनेता असतो, एक आवाज असतो. पण जेंव्हा एखादी व्यक्ती ५ दशकं अभिनय करत राहते आणि ह्या ५ दशकांत जवळजवळ संदर्भहीन होत नाही तेंव्हा ती व्यक्ती महानायक असते. अशा एका महानायकाचा, अमिताभ बच्चन साहेबांचा आज वाढदिवस.
सिनेमा ही कला अद्भुत आहे, कारण एकतर समाजात सुरु असलेली घुसळण, सिनेमाच्या पडद्यावर चोखपणे प्रकट होऊ शकते, ती खूप वेगाने सर्वदूर पोहचु शकते आणि तिला एक नायक असतो, ज्याच्यात समाज आपलं प्रतिबिंब पाहत असतो. बच्चन साहेब १९७० च्या दशकातील अस्वस्थतेचं आणि बंडखोरीचं सिनेमाच्या पडद्यावर उमटलेलं प्रतिबिंब होते. पुढे भारतीय सिनेमा बरा-वाईट-प्रगल्भ होत गेला तेंव्हा, सिनेमाच्या प्रत्येक वळणावर बच्चन साहेब होते, आणि ह्या प्रत्येक टप्प्यावर श्रेय अपश्रेय पचवण्याची ताकद ते ठेऊन होते म्हणून ते महानायक ठरले.
ह्या माणसाने आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले, पण उतारांनी हा माणूस खचला नाही कारण त्यांचं 'अभिनय' ह्या कलेवर कमालीचं प्रेम होतं, त्यामुळे सहजपणे त्यांनी 'कौन बनेगा करोडपती' ह्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालनपद स्वीकारलं आणि ते उत्कृष्ट निभावलं की, आज २१ वर्ष झाली ह्या कार्यक्रमाला पण हा कार्यक्रम लोकं आज देखील बघतात तो फक्त बच्चनसाहेबांसाठी. ही लवचिकता आणि हे कामाप्रती प्रेम दुर्मिळ.
बच्चन साहेब आत कायम धगधगत असतात असं मला वाटत आलं, अर्थात ती धगधग पडद्यावर प्रकट होताना तिचं स्वरूप दशकांनुसार बदलत गेलं आणि ते प्रकटीकरण अधिक प्रगल्भ होत गेलं. अमिताभ बच्चन नावाचं अग्निकुंड असंच कायम धगधगत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. बच्चन साहेबांना वाढदिवसाच्या अनेकोत्तम शुभेच्छा.
-राज ठाकरे
#AmitabhBachchan#AmitabhBachchanBirthday@SrBachchanpic.twitter.com/RfPqC2tpzs
— Raj Thackeray (@RajThackeray) October 11, 2022