Flashback : ऐश्वर्या रायचा ‘भाऊ’ बनणार होता सलमान खान... जाणून घ्या मग काय झाले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 11:22 AM2020-04-20T11:22:08+5:302020-04-20T11:25:38+5:30
आज ऐश्वर्या रायच्या लग्नाचा वाढदिवस.
बॉलिवूडची सौंदर्याची खाण ऐश्वर्या राय बच्चन हिच्या लग्नाचा आज वाढदिवस. लग्नानंतर ऐश्वर्या आपल्या संसारात आनंदी आहे. पती अभिषेक, मुलगी आराध्या यांच्यासोबत सुखी आयुष्य जगतेय. पण सेलिब्रिटी या नात्याने भूतकाळ पिच्छा कसा सोडणार? लग्नाच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर ऐश्वर्याच्या पूर्वायुष्याचा भाग असलेले किस्से आणि कहाण्या पुन्हा समोर येत आहेत. ऐश्वर्या आणि सलमान खान यांच्या नात्याची कहाणी यापैकीच एक. सोशल मीडियावर ऐश्वर्या व सलमानच्या नात्याबद्दलचे किस्से वारंवार चघळले जातात.
असाच एक किस्सा म्हणजे, जेव्हा सलमान ऐश्वर्याचा ‘भाऊ’ बनणार होता. होय, एका चित्रपटात सलमानला चक्क ऐश्वर्याच्या भावाच्या भूमिकेसाठी विचारण्यात आले होते.
खरे तर सलमान खान आणि ऐश्वर्या राय या जोडीचा त्यावेळी नको इतका बोलबाला होता. नायक-नायिकेच्या भूमिकेसाठी या जोडीला घेण्यास प्रत्येक निर्माता-दिग्दर्शक उत्सुक होता. पण एका चित्रपटात मात्र सलमानला चक्क ऐश्वर्याच्या भावाच्या भूमिकेसाठी विचारणा झाली होती.
शाहरुख खान आणि ऐश्वर्या रायचा ‘जोश’ हा चित्रपट तुम्हाला आठवत असेलच. या चित्रपटातील ‘हम भी है जोश में बाते कर होश में हे...’ हे गाणे आजही अनेकांच्या ओठावर रुळलेले आहे. या चित्रपटात शाहरुख आणि ऐश्वर्या हे भाऊ-बहिणीच्या भूमिकेत होते. याच चित्रपटासाठी आधी सलमानला विचारणा झाली होती. सलमानला ऐश्वर्याच्या भावाची भूमिका ऑफर केली गेली होती. मन्सूर खान या चित्रपटाचे दिग्दर्शक होते आणि गणेश जैन व रतन जैन यांनी हा सिनेमा प्रोड्यूस केला होता. आपल्या चित्रपटात सलमान ऐश्वर्याचा भाऊ बनावा, अशी मन्सूर यांची इच्छा होती. परंतु सलमानने त्यांच्या या इच्छेवर पाणी फेरले. ऐश्वर्याचा भाऊ बनण्याची कल्पना सलमानला जराही रूचली नाही. त्याने या भूमिकेला स्पष्ट नकार दिला. सलमानने नकार दिल्यावर मन्सूर यांनी त्याच्या जागी शाहरूखला ही भूमिका ऑफर केली आणि ऐश्वर्या व सलमान भाऊ-बहिण बनलेत.
‘जोश’ या चित्रपटात शाहरुख आणि ऐश्वयासोबत चंद्रचूड सिंग, शरद कपूर यांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटातील अपुन बोला तू मेरी..., हम तो दिल से हारे..., अशी अनेक गाणी चांगलीच गाजली होती. या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर चांगलीच कमाई केली होती. हा चित्रपट भारतातच नव्हे तर जगभरात गाजला होता.