#HappyBirthdaySRK : अन् दिसण्यावरून शाहरुख खानला ऐकावे लागले होते बरेच काही!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2018 09:38 AM2018-11-02T09:38:31+5:302018-11-02T09:41:42+5:30
आज शाहरुख यशाच्या शिखरावर आहे. पण एक काळ असाही होता, जेव्हा फ्लॉप चित्रपटाचे सगळे खापर त्याच्या डोक्यावर फोडले गेले होते.
शाहरूख खान याचा आज (2 नोव्हेंबर)वाढदिवस. आज शाहरुख बॉलिवूडचा किंगखान म्हणून ओळखला जातो. बॉलिवूडमध्ये कुठलाही गॉडफादर नसताना, चित्रपटाची कुठलीही पार्श्वभूमी नसताना त्याने बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक प्रस्थ निर्माण केले. आज शाहरुख यशाच्या शिखरावर आहे. पण एक काळ असाही होता, जेव्हा फ्लॉप चित्रपटाचे सगळे खापर त्याच्या डोक्यावर फोडले गेले होते. करिअरच्या त्या काळात शाहरुखचे नाक चित्रपट फ्लॉप होण्यासाठी कारणीभूत असल्याचे म्हटले गेले होते. होय, शाहरुखने आपल्या करिअरची सुरूवात ‘दीवाना’पासून केली. यात त्याच्यासोबत दिव्या भारती आणि ऋषी कपूर होते. म्हणजे, लीड रोलमध्ये दिसण्याची त्याची इच्छा अधूरी राहिली. ‘दीवाना’नंतर आलेल्या ‘दिल आशना है’ या चित्रपटाने शाहरुखची सोलो लीडची इच्छा पूर्ण केली. हेमा मालिनी यांनी बनवलेल्या ‘दिल आशना है’मध्येही दिव्या भारती हीच शाहरुखची हिरोईन होती. पण शाहरूखचा खऱ्या अर्थाने डेब्यू असलेला हा चित्रपट दणकून आपटला. विशेष म्हणजे, यानंतर हा चित्रपट फ्लॉप होण्याच्या कारणांची चर्चा रंगली. शाहरूखच्या
नाकाच्या ठेवणीमुळे ‘दिल आशना है’ फ्लॉप झाला, असे म्हटले गेले. हा नवा हिरो, हिरोसारखा वाटत नाही, असेही म्हटले गेले. अर्थात पुढे शाहरुखने हे सगळे खोटे सिद्ध केले. १९९३ मध्ये आलेल्या ‘बाजीगर’ आणि ‘डर’ या चित्रपटाने हा हिरो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनला. पण या चित्रपटांनी निगेटीव्ह हिरो अशी शाहरुखची ओळख बनली. ही ओळख मिटली ती १९९५ मध्ये. या वर्षांत शाहरुखचे सात सिनेमे रिलीज झालेत. यापैकीच एका ‘दिलवाले दुल्हनियां ले जाऐंगे’ने इतिहास रचला आणि शाहरूख रोमान्सचा बादशाह बनला.