याला म्हणतात 'जिगरा'! हर्षवर्धन राणेने लोकांना ऑक्सिजन मिळावा म्हणून विकायला काढली बाईक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2021 04:49 PM2021-05-02T16:49:24+5:302021-05-02T16:50:15+5:30
हर्षवर्धनचे बाईक प्रेम सर्वांनाच ठाऊक आहे. अशात आपली आवडती बाईक लोकांच्या मदतीसाठी विकायला काढणे यासाठी मोठा जिगरा लागतो.
देशात कोरोनाची भीषण स्थिती आहे. एकीकडे देशात रोज लाखो नवे कोरोना रूग्ण सापडत आहेत़. दुसरीकडे ऑक्सिजन व बेड्सचा प्रचंड तुटवडा भासतो आहे. लोक हतबल आहेत. ऑक्सिजन व बेड्स अभावी आपल्या आप्तांना डोळ्यांदेखत मरताना पाहून हवालदिल झाले आहेत. ही भीषण स्थिती पाहून कोणत्याही संवेदनशील मनांना पाझर फुटेल. अशात मदतीचे हात पुढे येत आहेत. अभिनेता हर्षवर्धन राणे (Harshvardhan Rane) याने काय तर लोकांना ऑक्सिजन मिळावा म्हणून त्याची आवडती बाईक विकायची तयारी केली आहे. (Harshvardhan Rane decided to sold his bike to help people )
होय, हर्षवर्धनने इन्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो आपल्या आवडत्या बाईकसोबत दिसत आहे. हा फोटो शेअर करत त्याने लिहिले, ‘माझी ही बाईक विकायला मी तयार आहे़.. त्या पैशांतून मी ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर विकत घेऊन ज्यांना गरज आहे त्यांना मदत करीन...हैदराबादमध्ये मला चांगल्या गुणवत्तेचे ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर हवे आहेत....’
हर्षवर्धनचे बाईक प्रेम सर्वांनाच ठाऊक आहे. अशात आपली आवडती बाईक लोकांच्या मदतीसाठी विकायला काढणे यासाठी मोठा जिगरा लागतो. त्यामुळे युजर्सनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
‘कितनी प्यारी बात है यह हर्ष. ढेरो आशिर्वाद मिलेंगे आपको, संभाल नहीं पाओगे, लव्ह यू’, असे त्याच्या या पोस्टवर कमेंट करताना एका युजरने लिहिले. तू रिअल हिरो आहेस, असे अनेकांनी लिहित हर्षवर्धनच्या या पुढकाराचे कौतुक केले. अनेकांनी भावुक मॅसेज लिहिले. तु तुझ्या बाईकवर किती प्रेम करतोस आम्हाला ठाऊक आहे मित्रा, यालाही जिगर लागतं, असे एकाने लिहिले आहे.
सनम तेरी कसम या चित्रपटातून हर्षवर्धनने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटातील त्याच्या कामाचे बरेच कौतुक झाले होते. यानंतर पलटन या चित्रपटात तो झळकला. अर्थात बॉलिवूडमध्ये त्याला म्हणावे तसे यश मिळाले नाही.
गेल्यावर्षी करोनाची पहिली लाट जेव्हा आली होती तेव्हा हर्षवर्धनला करोनाची लागण झाली होती. त्यावेळी त्याच्यावर आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते.