कोणाचीही भीती नाही...! लॉकअपमध्ये असलेल्या हिना पांचालला बहिणीचा पाठींबा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2021 16:34 IST2021-07-01T16:34:01+5:302021-07-01T16:34:33+5:30
Rave Party Busted by Police : नाशिकमधील इगतपुरी येथे हाय प्रोफाईल रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला होता. याप्रकरणी 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्री हिना पांचाळ हिला पोलिसांनी अटक केली आहे.

कोणाचीही भीती नाही...! लॉकअपमध्ये असलेल्या हिना पांचालला बहिणीचा पाठींबा
इगतपुरीच्या रेव्ह पार्टीत अंमलीपदार्थांचे सेवन करताना आढळून आलेल्या २२ व्यक्तींपैकी एक असलेली बॉलिवूड अभिनेत्री हिना पांचालचा (Heena Panchal) गत 26 जूनला अटक झाली. पोलिसांनी हिनासह 22 जणांना बेड्या ठोकल्या. ‘बिग बॉस मराठी’ फेम हिना यानंतर अचानक चर्चेत आली आहे. तिच्या अटकेवर आता तिची आई व बहिण दोघींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. हिना निर्दोष आहे आणि कोणाचीही भीती नाही, असं हिनाच्या बहिणीनं म्हटलं आहे.
हिनाने काहीही चुकीचं केलेलं नाही. ती तिच्या मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीत गेली होती. जाण्याआधी तिनं आईची परवानगी देखील घेतली होती. सगळं काही ठीक आहे म्हणून ती गेली होती. यानंतर आम्ही हीनाबद्दलच्या बातम्या वाचल्या. अनेकांना अटक झाली. पण फक्त हिनाचं नाव हायलाइट करण्यात आलं. हिनाजवळ हे मिळालं, ते मिळालं, असं काय काय सांगितलं गेलं. मी फक्त इतकंच म्हणेल की, जे माझ्या बहिणीला ओळखतात, त्यांनी यावर विश्वास ठेऊ नये.
आमचा तिच्यावर विश्वास आहे की, ती असे काही करू शकत नाही आणि सध्या आमचं लक्ष हिनाला तुरूंगातून बाहेर काढण्यावर आहे, असं हिनाची बहीण म्हणाली.
हिनाच्या आईनेही, माझी मुलगी चुकीचं काही करूच शकत नाही, अशी प्रतिक्रिया दिली. ‘ हिना असं करू शकत नाही कारण ती तशी नाही. हिनाबद्दल नको त्या गोष्टी ऐकून आम्हाला धक्काच बसला. तिच्या वडिलांची तर तब्येत खालावली,’ असं ती म्हणाली.
हिना ही ‘बिग बॉस मराठी’ या रिअॅलिटी शोमध्ये वाईल्ड कार्ट एन्ट्री म्हणून सहभागी झाली होती. पण महाअंतिम फेरीआधीच तिचा प्रवास संपुष्टात आला होता. हिनानं हुक्का, मोहल्ला, बेबो बेबो, राजू ओ राजू, बोगन अशा काही चित्रपटांमध्ये काम केलं आहे. याशिवाय हिंदी, मराठी, तामिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये तिनं ‘आयटम साँग’ केले आहेत.