‘शोले’मध्ये का नाही हेमा मालिनी व संजीव कुमारचा एकही एकत्र सीन? वाचा पडद्यामागची कहाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 12:48 PM2019-10-16T12:48:31+5:302019-10-16T12:48:31+5:30
बॉलिवूडची ड्रिमगर्ल हेमा मालिनी यांचा आज वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्त ‘शोले’ची पडद्यामागची कहाणी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
बॉलिवूडची ड्रिमगर्ल हेमा मालिनी यांचा आज वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्त ‘शोले’ची पडद्यामागची कहाणी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. होय, ‘शोले’मध्ये बसंती बनलेल्या हेमा आणि ठाकूर बनलेले संजीव कुमार यांच्यात एकत्र असा एकही सीन नाही. खरे तर ठाकूर आणि बसंती एकाच गावचे. इतकेच नाही तर बसंती हीच जय आणि वीरूला ठाकूरच्या घरी पोहोचवते. याऊपरही संपूर्ण चित्रपटात ठाकूर व बसंतीचा एकत्र असा एकही सीन नाही. एवढेच नाही तर एकाही ठिकाणी ठाकूरच्या तोंडावर बसंतीचे नाव येत नाही. खरे सांगायचे तर यामागे एक कारण आहे. हे कारण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
70 च्या दशकात संजीव कुमार आणि हेमा मालिनी यांच्या अफेअरची जोरदार चर्चा होती. असे म्हणतात की, संजीव कुमार खुद्द लग्नाचा प्रस्ताव घेऊन हेमा यांच्या आई-वडिलांना भेटायला गेले होते. पण आम्ही हेमासाठी आपल्या जातीचा मुलगा आधीच शोधून ठेवला आहे, असे सांगून हेमा यांच्या आईने संजीव कुमार यांना परत पाठवले.
हेमा यांना ही गोष्ट कळली आणि हेमाने आईला जोरदार विरोध केला. पण आईने हेमाला संजीव कुमार यांच्याबद्दल अशा काही गोष्टी सांगितल्या की, हेमा शांत झाल्या. मात्र संजीव कुमार इरेला पेटले होते. त्यांनी लग्नाचा प्रस्ताव घेऊन आपल्या जिगरी मित्राला म्हणजेच जितेन्द्र यांना हेमाकडे पाठवले. इथेही झाले वेगळेच.
होय, संजीव कुमार यांचा प्रेमप्रस्ताव घेऊन हेमाकडे गेलेले जितेन्द्र स्वत:च हेमाच्या प्रेमात बुडाले. इतकेच नाही संजीव कुमारचे प्रेमपत्र स्वत:चे भासवून त्यांनी ते हेमाला दिले. हेमाच्या आईला कसेही करून संजीव कुमारपासून आपल्या लेकीला दूर ठेवायचे होते. म्हणून तिने ही जबाबदारी धर्मेन्द्र यांच्यावर सोपवली. धर्मेन्द्र विवाहित होते. मुलांचे बाप होते. त्यांच्यापासून आपल्या मुलीला धोका नाही, असे हेमाच्या आईला वाटले होते. पण झाले उलटेच धर्मेन्द्र हेमाच्या प्रेमात असे काही बुडाले की, ते त्यांच्यावर अधिकार गाजवू लागले. हेमाच्या आईसाठी हा आणखी मोठा धक्का होता. याचदरम्यान जितेन्द्र यांनी हेमा यांच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली.
संजीव कुमार आणि धर्मेन्द्र यांच्यापासून पिच्छा सोडवण्यासाठी हेमाच्या आईने जितेन्द्र यांचा प्रस्ताव लगेच स्वीकारला. तिने हेमालाही या लग्नासाठी त्यार केले. जितेन्द्र व-हाड्यांसह लग्नासाठी पोहोचले. पण धर्मेन्द्र यांना याची कुणकुण लागली आणि त्यांनी ऐनवेळी जितेन्द्र व हेमा यांचे लग्न मोडले.
यादरम्यान संजीव कुमार पुन्हा एकदा हेमा यांच्यासोबत जवळीक साधू लागले. ‘शोले’च्या सेटवर त्यांनी हेमाला थेट प्रपोज केले. धर्मेन्द्र यांना ही गोष्ट कळली तेव्हा ते संतापले आणि थेट ‘शोले’चे दिग्दर्शक रमेश सिप्पी यांच्याकडे गेले. ‘शोले’त संजीव कुमार आणि हेमाचा एकत्र सीन असता कामा नये, तरच मी हा सिनेमा करेल, असे धर्मेन्द्र यांनी सिप्पी यांना सांगितले. दुसरीकडे हेमाला लग्नासाठीही राजी केले.