Heropanti 2 Review : अ‍ॅक्शनचा फसलेला गेम टायगर श्रॉफचा 'हिरोपंती २'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 03:35 PM2022-04-29T15:35:12+5:302022-04-29T15:53:27+5:30

जाणून घ्या कसा आहे टायगर श्रॉफ आणि तारा सुतारियाचा Heropanti 2 सिनेमा..

Heropanti 2 review tiger shroff tara sutaria nawazuddin siddiqui starrer | Heropanti 2 Review : अ‍ॅक्शनचा फसलेला गेम टायगर श्रॉफचा 'हिरोपंती २'

Heropanti 2 Review : अ‍ॅक्शनचा फसलेला गेम टायगर श्रॉफचा 'हिरोपंती २'

googlenewsNext

दर्जा : दीड स्टार
कलाकार : टायगर श्रॅाफ, तारा सुतारीया, नवाजुद्दीन सिद्दीकी, अमृता सिंग, झाकीर हुसेन
दिग्दर्शक : अहमद खान
निर्माता : साजीद नाडीयादवाला
शैली : रोमँटिक-अ‍ॅक्शन
कालावधी : २ तास २२ मिनिटे
परीक्षण : संजय घावरे

 

चित्रपटाच्या शेवटी नायक जेव्हा खलनायकाला जेरबंद करतो, तेव्हा 'बहुत ही घटिया लेव्हल है तेरा...' हा डायलॅाग मारतो, जो चित्रपटालाही लागू पडतो. क्लायमॅक्सनंतर 'हिरोपंती ३' बनवण्याचे संकेत देण्यात आले आहेत, पण चित्रपट पाहिल्यावर मात्र बस झालं... आता पुढचा भाग नको अशीच काहीशी मानसिक अवस्था होते. एक चांगला चित्रपट बनवण्यासाठी सशक्त पटकथेची गरज असते. त्यावर पुढील डोलारा उभारला जातो. दिग्दर्शक अहमद खान यांना नेमक्या याच गोष्टीचा विसर पडल्यानं 'हिरोपंती २'च्या रूपात त्यांनी एक बेसलेस चित्रपट बनवला आहे. लॅाजिकलेस घटनांना केवळ हाणामारी, गीत-संगीत आणि नृत्याचा तडका देण्यात आला आहे.

३१ मार्चपूर्वी सर्वजण टॅक्स भरत असल्याने सर्व भारतीयांची बँक अकाऊंट्स हॅक करून तो पैसा स्वत:च्या घशात घालण्याची योजना लैला नावाचा जादूगर आखतो. दुसरीकडे चित्रपटाचा नायक बबलू परदेशात अत्यंत साधा-भोळा बनून जीवन जगत असतो. एक दिवस अचानक त्याची भेट इनाया या त्याच्या गर्लफ्रेंडशी होते आणि त्याचं पूर्वाश्रमीचं आयुष्य पुन्हा त्याच्या समोर येतं. आपल्यावर येणाऱ्या संकटातून वाचण्यासाठी मदत मिळावी यासाठी तो एक कॉल करतो, पण घडतं भलतंच. ते जे काही घडतं ते उलट्या-सुलट्या कशाही क्रमानं पडद्यावर पहायला मिळतं.

पटकथा मिसिंग असलेला हा चित्रपट आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील गुन्हेगारांसाठी लढण्यासाठी एक ठोस कारण असावं लागतं, तेही यात नाही. सिक्रेट आॅपरेशन सुरू होतं, त्यातही बराच गोंधळ घालण्यात आला आहे. आजवर बऱ्याचदा समोर आलेली खलनायकी शैली आणि नेहमीच्याच शैलीतील नायक यात आहे. खलनायक जादूगर आहे, पण जादूचे शोज करण्याऐवजी जनतेचे पैसे लाटण्याच्या प्लॅनिंगमध्येच व्यग्र आहे. नायक त्याच्यापासून लपतोय, पळतोय असं वाटतं, पण तोच खलनायकाला खेळवतोय असं सांगतो. कमरेच्या खालच्या बाजूस लागलेली गोळी काढलेला नायक दुसऱ्याच सीनमध्ये गाण्याच्या तालावर नाचताना दिसतो. वेगात धावणाऱ्या ट्रेनमध्ये गुंड ९० अंशांच्या कोनात अख्खी जीप घुसवतात तरीही जीपला एक साधा स्क्रॅच पडत नाही. एक ना धड भाराभर चिंध्या अशातलाच हा प्रकार आहे. अ‍ॅक्शन दृश्यांनी अतिशयोक्तीचं शिखर गाठलं आहे. गीत-संगीत सामान्य तर आहेच, पण कथेमध्ये अडथळा आणणारंही आहे. दिग्दर्शक प्रख्यात कोरिओग्राफर असूनही कोरिओग्राफीवरही विशेष मेहनत घेण्यात आल्याचं जाणवत नाही. टायगरसोबत क्रिती सॅनोननं 'हिरोपंती'द्वारे बॅालिवूडमध्ये एंट्री केली होती, पण या चित्रपटात ती केवळ 'व्हिसल बजा...' या गाण्यात दिसते, जे चांगलं झालं आहे.

टायगर श्रॅाफने आपलं काम चोख बजावलं आहे. अभिनयासोबतच अ‍ॅक्शन आणि डान्स हे त्याचे प्लस पॅाइंटस आहेत, पण यात डान्सचा जलवा फारसा दिसत नाही. फक्त क्रितीसोबतच्या गाण्यात थोडा वेगळा डान्स आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीच्या अभिनयाचा वेगळा रंग पहायला मिळतो. लैलाचं कॅरेक्टर त्यानं चांगलं पोर्ट्रे केलं आहे. तारा सुतारीयाचं काम ठिकठाक आहे. अमृता सिंग यांनी एक देवभोळी आई साकारली आहे. झाकीर हुसेन यांनी साकारलेला आॅफिसर फार प्रभावी वाटत नाही. थोडक्यात काय तर 'बहुत ही घटिया लेव्हल है तेरा' या डायलॉगने चित्रपटाचा शेवट होतो, मात्र प्रेक्षकांच्या डोक्यात हा डायलॉग बसला असावा असे त्यांच्या चेहऱ्यावरून तरी दिसते. बाकी सुज्ञास अधिक न सांगणे.

Web Title: Heropanti 2 review tiger shroff tara sutaria nawazuddin siddiqui starrer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.