"DDLJ च्या शूटिंगवेळी पतीचं निधन...", हिमानी शिवपुरींनी सांगितली आठवण, म्हणाल्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 09:00 AM2024-10-25T09:00:00+5:302024-10-25T09:00:02+5:30
अभिनेत्रीने सलमान खानच्या थेट कानाखाली मारली होती. काय आहे तो किस्सा?
अभिनेत्री हिमानी शिवपुरी (Himani Shivpuri) यांची वेगळी ओळख सांगण्याची गरज नाही. मालिका ते सिनेमा सगळीकडेच त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. 'हम आपके है कौन', 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे', 'कुछ कुछ होता है', 'कभी खुशी कभी गम' अशा अनेक सिनेमांमध्ये काम केलं. आज हिमानी ६४ वा वाढदिवस साजरा करत आहेत.
डीडीएलजेच्या शूटवेळी आली पतीच्या निधनाची बातमी
हिमानी शिवपुरींनी दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' ची आठवण सांगितली. सिनेमातील त्यांची अनुपम खेर यांच्यासोबतची केमिस्ट्री सगळ्यांनाच आवडली. क्लायमॅक्समध्येही खरं तर त्यांचा सीन असणार होता मात्र हिमानी शिवपुरी यांच्या पतीचं निधन झालं आणि त्यामुळे तो सीन शूट होऊ शकला नव्हता. त्या म्हणाल्या, 'मी डीडीएलजे चा क्लायमॅक्स शूट करण्यासाठी जात होते तेव्हाच मला फोन आला. पतीचं निधन झाल्याचं मला कळलं आणि मला मोठा धक्का बसला. सगळंच थांबल्यासारखं वाटलं. मी तातडीने शूट सोडून तिकडे गेले. मी एकटीनेच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारही केले. यानंतर अस्थी विसर्जनासाठी मी हरिद्वारला गेले."
त्या पुढे म्हणाल्या, "मी आजही ते दिवस विसरु शकत नाही. माझ्या आयुष्यातला सर्वात भयानक काळ होता. तरी मी त्यातून सावरले आणि पुन्हा कामात व्यस्त झाले."
...अन् सलमान खानच्या कानाखालीच मारली
सलमान खानसोबतचा एक किस्सा सांगताना त्या म्हणाल्या, "बीवी नंबर १' च्या शूटिंगवेळी मी सेटवर बसले होते. बराच वेळ झाला पण सलमान आलाच नाही. नंतर मला शूटिंग आता होणार नाही असं सांगण्यात आलं. मग मी जवळच्या एका मॉलमध्ये शॉपिंग करायला गेले. मी परत आले तेव्हा डेव्हिड धवन माझ्यावर ओरडले. 'तू इथे शूटिंगला करायला आली आहे की शॉपिंगला?' मला रडायला आलं आणि सलमानचा प्रचंड राग आला. मग 'हम आपके है कौन'च्या शूटिंगवेळी एका सीनमध्ये सलमानने मला चाची जान म्हणत उचलून घेतलं. सूरज बडजात्यांनी मला सीन समजावला होता, त्यात सलमान मला उचलतो असं काहीच नव्हतं. तेव्हा मी भडकले आणि त्याला कानाखाली मारली."