हिंदी राष्ट्रभाषा होती, आहे आणि राहील; अजय देवगणचं विधान, दाक्षिणात्य एकवटले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 10:54 AM2022-04-28T10:54:29+5:302022-04-28T10:55:07+5:30
हिंदी राष्ट्रभाषा नसल्याच्या मुद्द्यावरून किच्चा सुदीपवर भडकला अजय देवगण
मुंबई : मागील काही दिवसापासून हिंदी बॉक्स ऑफिसवर साऊथचे चित्रपट बक्कळ कमाई करत थेट हिंदी चित्रपटांनाच आव्हान देत आहेत. अलीकडच्या काळातील पुष्पा, आरआरआर आणि केजीएफ २ या चित्रपटांच्या हिंदी डब वर्जन्सनेही चांगली कमाई केली.अशातच कन्नड फिल्मस्टार किच्चा सुदीपने हिंदी ही राष्ट्रभाषा नसल्याचे वक्तव्य करत एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करत अजय देवगणने किच्चाला सडेतोड उत्तर दिले आहे.
दक्षिणात्य चित्रपटांना मिळत असलेल्या नेत्रदीपक यशाबाबत बोलताना हिंदी आता राष्ट्रभाषा नसल्याचे किच्चा म्हणाला होता. किच्चाच्या याच वक्तव्यावर अजयने ट्विट करत आपले मत व्यक्त केले. किच्चा सुदीप, माझ्या भावा तुझ्या म्हणण्यानुसार जर हिंदी आपली राष्ट्रभाषा नाही, तर मग तू आपल्या मातृभाषेतील चित्रपट हिंदी भाषेत डब करून का रिलीज करतोस? हिंदी आपली मातृभाषा आणि राष्ट्रभाषा होती, आहे आणि कायम राहील.
जन गण मन...’ असे ट्विट
अजयने केले. किच्चाने कन्नड चित्रपटांसोबत फूंक, रन, फूंक २, रक्तचरित्र आणि दबंग ३ या हिंदी चित्रपटांमध्येही काम केले.
बऱ्याच चित्रपटांमध्ये खलनायकी भूमिका साकारणाऱ्या किच्चाच्या या हिंदी भाषेविरोधी वक्तव्यानंतरही बॉलिवूडचे दरवाजे त्याच्यासाठी खुले राहतात का, हे पाहणेही उत्सुकतेचे ठरणार आहे.
.@KicchaSudeep मेरे भाई,
— Ajay Devgn (@ajaydevgn) April 27, 2022
आपके अनुसार अगर हिंदी हमारी राष्ट्रीय भाषा नहीं है तो आप अपनी मातृभाषा की फ़िल्मों को हिंदी में डब करके क्यूँ रिलीज़ करते हैं?
हिंदी हमारी मातृभाषा और राष्ट्रीय भाषा थी, है और हमेशा रहेगी।
जन गण मन ।
काय म्हणाला होता किच्चा?
एका इव्हेंटमध्ये सहभागी झालेला किच्चा केजीएफ चॅप्टर २ ला बॉक्स ऑफिसवर मिळालेल्या यशाबाबत बोलताना म्हणाला की, हिंदी आता राष्ट्रभाषा राहिली नाही. बॉलिवूड आजही पॅन इंडिया चित्रपट बनवत आहे. बॉलिवूडवाले तमिळ आणि तेलुगूमध्ये चित्रपट डब करून यश मिळविण्यासाठी संघर्ष करत आहेत. तरीही ते यशस्वी होत नाहीत. आज आपण असे चित्रपट बनवत आहोत, जे प्रत्येक ठिकाणी पाहिला आणि कौतुक केला जात आहे.
किच्चा सुदीपने अजयला दिलेले उत्तर
अजयने विचारलेल्या प्रश्नावर सुदीपने ट्विट केले की, अजय देवगण सर तुम्ही हिंदीत दिलेली प्रतिक्रिया मला समजली. कारण आम्ही सर्वांनी हिंदीचा आदर केला आहे, प्रेम केले आहे आणि शिकलो आहे. काही हरकत नाही सर, पण माझी प्रतिक्रिया कन्नडमध्ये टाईप झाली तर काय परिस्थिती उद्भवली असती याचा विचार करत होतो, आम्हीही भारताचे आहोत सर...