'अर्जुन रेड्डी' चित्रपटाचा हिंदी रिमेक 'ह्या' नावाने होणार प्रदर्शित
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 06:50 PM2018-10-26T18:50:10+5:302018-10-26T18:53:45+5:30
दाक्षिणात्य चित्रपट 'अर्जुन रेड्डी' या चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये अभिनेता शाहिद कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
दाक्षिणात्य चित्रपट 'अर्जुन रेड्डी'च्या रिमेकची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. या चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये अभिनेता शाहिद कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर शाहिद कपूरने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहे. या चित्रपटाचे नाव 'कबीर सिंग' असणार आहे. 'अर्जुन रेड्डी' चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वांगा यांनी केले होते. आता हिंदी रिमेकचे दिग्दर्शनही संदीप वांगा करणार आहेत.
शाहिदने इंस्टाग्रामवर सिनेमाचे पोस्टर शेअर करून लिहिले की, 'सर्वांनी 'अर्जुन रेड्डी'वर भरभरून प्रेम केले आता कबीर सिंगलाही तुमच्याकडून त्याच प्रेमाची आशा आहे.'
दिग्दर्शक संदीप वांगा यांनी सांगितले की, 'जेव्हा आम्ही या सिनेमाच्या हिंदी स्क्रीप्टवर काम सुरू केले तो प्रवास खूप उत्साही होता. कबीर सिंग हा या सिनेमातील नायक आहे. '
'कबीर सिंग' हा चित्रपट २१ जून २०१९ ला प्रदर्शित होत आहे. गेल्या आठवड्यापासून शाहिदने ‘कबीर सिंग’च्या चित्रीकरणास सुरूवात केली. मुंबई- दिल्लीमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण पार पडणार आहे. या चित्रपटात शाहिद वैद्यकीय शाखेतील विद्यार्थ्यांच्या भूमिकेत दिसणार आहे. शाहिद या चित्रपटात एका वेगळ्याच रुपात दिसणार आहे. यात त्याचे चार लूक पाहायला मिळणार आहेत आणि शाहरूख गेल्या तीन महिन्यापासून या भूमिकेच्या तयारीला लागला आहे. शाहिद सोबत या चित्रपटात कियारा अाडवाणी दिसणार आहे. 'एम.एस. धोनी', 'लस्ट स्टोरी'मध्ये कियाराने काम केले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने कियारा, शाहिद पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. शाहिदचे चाहते 'कबीर सिंग' चित्रपटाबद्दल जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक आहेत.