१०६ वर्षांचा झाला हिंदी सिनेमा! आजच्याच दिवशी प्रदर्शित झाला होता पहिला चित्रपट!!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2019 12:59 PM2019-05-03T12:59:30+5:302019-05-03T13:47:44+5:30
प्रेक्षकांना रिझवणाऱ्या हिंदी सिनेमाला आज (3 मे) १०६ वर्षे पूर्ण झालीत. या १०६ वर्षांत हिंदी सिनेसृष्टीने अनेक मैलांचे अंतर पार केले.
प्रेक्षकांना रिझवणाऱ्या हिंदी सिनेमाला आज (3 मे) १०६ वर्षे पूर्ण झालीत. या १०६ वर्षांत हिंदी सिनेसृष्टीने अनेक मैलांचे अंतर पार केले. अगणिक चित्रपट, अगणिक कलाकार, बदलते तंत्रज्ञान, बदलते विषय-विचार अशी स्थित्यंतरे चित्रपटसृष्टीने अनुभवली. पण यासगळ्यात पहिला बॉलिवूड चित्रपट आजही सिनेरसिकांच्या मनात जिवंत आहे. तो चित्रपट म्हणजे, ‘राजा हरीश्चंद्र’. १९१३ साली आजच्याच दिवशी म्हणजे ३ मे रोजी ‘राजा हरीश्चंद्र’ हा बॉलिवूडचा पहिला मूकपट प्रदर्शित झाला होता. भारतीय सिनेसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी हा चित्रपट बनवला होता. हिंदी सिनेमाला १०६ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जाणून घेऊ या, ‘राजा हरीश्चंद्र’चा प्रवास...
खरे तर ‘राजा हरीश्चंद्र’ हा चित्रपट पडद्यावर पाहणे त्याकाळी कुठल्या आश्चर्यापेक्षा कमी नव्हते. अतिशय मर्यादीत संसाधने असूनही हा चित्रपट कसा तयार झाला आणि तो पाहायला प्रेक्षक चित्रपटगृहांपर्यंत कसे गेलेत, यावरून हा इतिहास किती रंजक असावा, याचा अंदाज यावा. मुंबईत राहून फिल्मी पत्रकारीता करणारे वेद विलास उनियाल यांचे मानाल तर, ‘राजा हरीश्चंद्र’ हा चित्रपट दादासाहेब फाळके यांच्या जिद्द आणि चिकाटीचा परिणाम आहे.
१९११ मध्ये मुंबईत ‘लाईफ आॅफ क्राइस्ट’ नामक इंग्रजी चित्रपट पाहून दादा साहेब फाळके यांना हिंदी चित्रपट बनवण्याची कल्पना सुचली होती. ही कल्पना सुचली आणि ती मूर्तरूपात आणण्याच्या ध्येयाने त्यांना झपाटले. सुरुवातीला त्यांनी भगवान श्रीकृष्णांच्या लीलांवर आधारित चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला. यासाठी श्रीकृष्ण चरित्रातील एक छोटासा प्रसंग घेण्याचे त्यांनी ठरवले. पण कालांतराने ‘राजा हरीश्चंद्र’ या चित्रपटाची रूपरेषा त्यांनी पक्की केली.
त्या काळात चित्रपट बनवणे आव्हान होते. कारण त्यासाठीची उपकरणे भारतात नव्हती. दादा साहेब फाळके यांनी काय करावे, तर मित्रांकडून उसनवारी करून ते लंडनला गेले आणि त्यांनी चित्रपटाचे तंत्र व उपकरणे मिळवली. कॅमेरा, कच्ची फिल्म, फिल्मला भोके पाडण्याचे मशीन अशी सगळी जमवाजमव करून दादासाहेब फाळके भारतात परतले. हा सर्वात महत्त्वाचा टप्पा पूर्ण केल्यानंतर कलाकारांची निवड हे दुसरे मोठे आव्हान त्यांच्यापुढे होते. कारण व्यावसायिक नट नव्हते. यावर मात करून दादासाहेब यांनी अनेक भूमिकांचे कास्टिंग केले. पण तारामतीच्या भूमिकेसाठी एकही महिला तयार होईना. अखेर दादासाहेबांनी एका चहावाल्याला या रोलमसाठी फायनल केले.
६ महिने २७ दिवसांच्या शूटींगनंतर हा चित्रपट बनून तयार झाला. ४० मिनिटांचा हा चित्रपटांच्या रीलची लांबी ३७०० मीटर होती आणि बजेट होता २० हजार रूपये. २१ एप्रिल १९१३ रोजी मुंबईच्या आॅलम्पिया थिएटरमध्ये याचे प्रीमिअर आयोजित केले गेले. ३ मे १९१३ रोजी चित्रपट प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाने विक्रम रचला. दादासाहेब फाळके यांनी रोवलेल्या याच छोट्या वृक्षाचा आज वटवृक्ष झाला आहे.