‘पानिपत’ हा चेष्टेचा विषय नाही हे शाळांमध्ये शिकवलं गेलं पाहिजे: आशुतोष गोवारीकर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 01:42 PM2020-01-25T13:42:06+5:302020-01-25T13:48:53+5:30
‘मी ‘पानिपत’ पैशासाठी नव्हे तर ज्या पॅशनने हा चित्रपट बनविला ती भावना लक्षात घ्या...
पुणे : ‘पानिपत’कडे मराठा साम्राजाचा पराभव म्हणून पाहिलं जात असलं तरी ही मराठ्यांची शौर्यगाथा आहे. ‘पानिपत’ हा चेष्टेचा विषय नाही. हे शाळांमध्ये शिकवलं गेलं पाहिजे, अशी अपेक्षा प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी व्यक्त केली. सुरुवातीला चित्रपटाला विरोध झाला. ‘मी ‘पानिपत’ पैशासाठी नव्हे तर ज्या पॅशनने हा चित्रपट बनविला ती भावना लक्षात घ्या,’ असे सांगितल्यानंतर विरोध काहीसा मावळला, असेही ते म्हणाले.
‘पानिपत’ चित्रपटाद्वारे मराठ्यांच्या शौर्याचा जाज्वल्य इतिहास मांडणाºया गोवारीकर यांचा ब्राह्मण जागृती सेवा संघाच्या वतीने राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांच्या हस्ते सत्कार झाला. त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ पांडुरंग बलकवडे, सभागृह नेते धीरज घाटे आणि ब्राह्मण जागृती संघाचे संस्थापक अंकित काणे उपस्थित होते. ‘पानिपत’संबंधी गोवारीकर यांचे विचार ऐकण्यासाठी तरुणाईसह ज्येष्ठांची गर्दी झाली होती.
लहानपणी ‘पानिपत’बद्दल मला फारसं माहिती नव्हतं. त्यात ऐकण्यासारखंदेखील काही नाही असं सांगितलं जायचं. पण आई-वडिलांनी बारा वर्षांचा असताना ‘पानिपत’ हे पुस्तक हातात दिलं आणि मी वाचून प्रभावित झालो असे सांगून गोवारीकर म्हणाले, ‘पानिपत’ मधील मराठ्यांचा इतिहास वाचून अंगावर काटा उभा राहिला. इतिहासात जेव्हा मागे वळून बघतो तेव्हा आपण १८ वे शतक सोडून पुढे जातो. मौर्य किंवा इतर इतिहासाबद्दल भरभरून बोलतो, पण मराठा साम्राज्याचा साधा उल्लेखही केला जात नाही याचं वाईट वाटलं. मराठी चित्रपटाला शंभर वर्षे झाली तरी कुणाला या इतिहासावर चित्रपट करावासा का वाटला नाही? असा प्रश्नदेखील पडला. त्यामुळे मला जर कधी संधी मिळाली तर या विषयावर नक्की चित्रपट करेन असं ठरवलं होतं. पण तशी संधी मिळणं अवघड होतं. कारण कोणत्याही निर्मात्याला ऐतिहासिक चित्रपटाचे कथानक सांगितल्यानंतर ‘आपण हरलो की जिंकलो’ हा प्रश्न विचारला जातो. कारण ही सगळी पैशाची थिअरी असते. पण निर्माता रोहित शेलटकर यालादेखील ‘पानिपत’वर चित्रपट करायची इच्छा होती. त्याला पानिपतचा इतिहास अवघ्या जगासमोर आणायचा होता. त्यामुळे हा योग जुळून आला.
पांडुरंग बलकवडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या वेळी चारुदत्त आफळे यांचे ‘पानिपतचा रणसंग्राम’ याविषयावर व्याख्यान झाले.
..............
आता चित्रपट केल्याबद्दल सत्कार...
खरंतर ’पानिपत’च्या इतिहासाचा घटनाक्रम खूप मोठा आहे. त्यामुळे चित्रपटात बऱ्याच गोष्टी समाविष्ट करता आल्या नाहीत याची खंत वाटते. मला फक्त ही शौर्यगाथा कशी घडली ते दाखवायचं होतं. पेशवे आणि मराठे कसे निघाले आणि काय घडले हेच केवळ मांडायचं होतं. मात्र चित्रपट प्रदर्शित होण्याच्या वेळी विरोध आणि टीकेचा सामना करावा लागला. तुम्ही चुकीचे तर दाखवत नाही ना? अशी विचारणा झाली. ज्या ठिकाणी ‘पानिपत’ घडले त्या उत्तर प्रदेशच्या काही प्रांतांमधून चित्रपटावर बंदी घालण्यात आली. पण आज याच विषयावर चित्रपट केल्याबद्दल सत्कार होतो आहे याचा मनस्वी आनंद असल्याची भावना गोवारीकर यांनी व्यक्त केली.