लग्नाच्या 12 वर्षांनंतर हनी सिंगचा घटस्फोट, पत्नीने केले होते घरगुती हिंसाचाराचे आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 07:42 PM2023-11-07T19:42:26+5:302023-11-07T19:43:32+5:30
गेल्या अडीच वर्षांपासून प्रकरण कोर्टात होते, आज अखेर कोर्टाने त्यांच्या घटस्फोटाला मंजुरी दिली.
Honey Singh: फेमस रॅपर हनी सिंग त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. हनी सिंगने त्याच्या पत्नीपासून 12 वर्षांनंतर घटस्फोट घेतला आहे. दिल्लीतील न्यायालयाने मंगळवारी दोघांचा घटस्फोट मंजूर केला. गेल्या अडीच वर्षांपासून सुरू असलेले न्यायालयीन प्रकरण अखेर आज संपुष्टात आले.
मागील अनेक दिवसांपासून हनी सिंगचे खासगी आयुष्य चर्चेत होते. हनीवर त्याची पत्नी शालिनी तलवार, हिने कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला होता. हा सर्व वाद संपवण्यासाठी त्यांच्यात एक करार झाला, या करारानंतर हनीच्या पत्नीने घरगुती हिंसाचाराचा खटला मागे घेतला. आता आज अखेर दोघे विभक्त झाले आहेत.
हनी सिंगवर काय आरोप होते ?
रॅपर हनी सिंगवर 2021 मध्ये शालिनी तलवारने घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. त्यादरम्यान पत्नीने त्याच्या कुटुंबावरही अनेक आरोप केले होते, ज्यामध्ये मानसिक आणि शारीरिक छळाचाही आरोप होता. याशिवाय हनी सिंगने तिची फसवणूक केली असून पैशांबाबतही फसवणूक केल्याचे शालिनीने तक्रारीत म्हटले होते. मात्र हनी सिंगने शालिनी तलवारचे सर्व आरोप फेटाळून लावले होते.
प्रेम, लग्न आणि घटस्फोट, अशी होती लव्ह स्टोरी
हनी सिंग आणि शालिनी तलवार एकमेकांना लहानपणापासून ओळखत होते. दोघेही शाळेपासून एकमेकांना डेट करायचे. 20 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी 2011 मध्ये दोघांनी लग्न केले. त्यांच्या लग्नाची बातमी कुणालाही माहिती नव्हती. याचा खुलासा खुद्द हनी सिंगने एका रिअॅलिटी शोदरम्यान केला होता. दोघांमध्ये सर्व काही ठीक चालले होते, परंतु 2021 मध्ये शालिनीने अचानक हनीवर मारहाणीचा आरोप केला. आता 2023 मध्ये कोर्टाने दोघांच्या घटस्फोटाला मंजुरी दिली आहे.