‘प्रत्येक कलाकृतीचा मान ठेवावा!’-शाहिद कपूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 05:23 PM2018-08-30T17:23:48+5:302018-08-30T18:00:44+5:30
‘बत्ती गुल मीटर चालू’ हा अभिनेता शाहिद कपूर, श्रद्धा कपूर आणि यामी गौतम यांच्या मुख्य भूमिकेतील चित्रपट आहे. हा चित्रपट २१ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार असून या चित्रपटाच्या बाबतीत शाहिद कपूर खूप उत्सुक आहे.
तेहसीन खान
‘बत्ती गुल मीटर चालू’ हा अभिनेता शाहिद कपूर, श्रद्धा कपूर आणि यामी गौतम यांच्या मुख्य भूमिकेतील चित्रपट आहे. हा चित्रपट २१ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार असून या चित्रपटाच्या बाबतीत शाहिद कपूर खूप उत्सुक आहे. हा चित्रपट वीज चोरीवर आधारित असून वीज कंपनीच्या पायऱ्या झिजवणाऱ्या सामान्य माणसाची कथा यात दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने शाहिद कपूरसोबत साधलेला हा संवाद...
* ‘बत्ती गुल मीटर चालू’ या चित्रपटाच्या ट्रेलर आणि ‘गोल्ड तांबा’ या गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळतेय. कसं वाटतंय?
- नक्कीच खूप आनंद होतोय. या चित्रपटाच्या ट्रेलरला आणि गाण्याला प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद पाहून खरंच खूप मस्त वाटतंय. मी असं नाही म्हणणार की, हा खूपच चर्चेत असलेला चित्रपट आहे की ज्याच्याबद्दल प्रेक्षकांना बरीच उत्सुकता आहे. या चित्रपटाचा विषय हा वीजसमस्येवर आधारित असून तो प्रेक्षकांना त्यांच्या अगदी जवळचा वाटतोय. चित्रपटाचे संगीतही प्रेक्षकांना आवडतेय, हे देखील तितकंच कौतुकास्पद आहे.
* तुला जेव्हा चित्रपटाची आॅफर आली तेव्हा तुझी रिअॅक्शन काय होती? ‘पद्मावत’ नंतर तू अगदीच विरूद्ध प्रकारची भूमिका करत आहेस, काय सांगशील?
- हा चित्रपट मी स्विकारला, त्यामागे दोन व्यक्तींचा हात आहे. एक म्हणजे माझी मॅनेजर आकांक्षा. मी बिझी असेल तर तीच माझ्या वतीने स्क्रिप्ट वाचते. या चित्रपटाच्या वेळीही तेच झाले. आकांक्षाने स्क्रिप्ट घरी पाठवली. तेव्हा मी पदमावत साठी शूटिंग करत होतो. माझी पत्नी मीरा हिने देखील मला या चित्रपटाची स्क्रिप्ट वाचण्याबद्दल सांगितले. मी स्क्रिप्ट वाचली, त्यात काही त्रुटी मला आढळल्या. पण, मला चित्रपटाची कल्पना आणि ज्या समस्येवर आधारित हा चित्रपट आधारलेला आहे, तो मला जास्त महत्त्वाचा वाटला. श्री नारायण सिंग यांनी यापूर्वी ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ हा चित्रपट देखील बनवला आहे. त्या चित्रपटाला प्रेक्षक ांनी डोक्यावर घेतले. तसाच पुन्हा एकदा प्रयत्न या निमित्ताने होत आहे, त्यामुळे मला या टीमचा भाग होणं भाग्याचे वाटते.
* तुझ्या व्यक्तिरेखेविषयी काय सांगशील?
- माझी व्यक्तिरेखा ही खूपच बोलबच्चन प्रकारची आहे. यात माझी भूमिका ग्रे शेडची आहे. त्याच्यात अशी कुठलीच गोष्ट नाही जी एखाद्या आदर्श युवकात असायला हवी. मात्र, मला राजा रावळ रतन सिंग याच्यापेक्षा या भूमिकेबद्दल हे आवडले की, हा सर्वसाधारण युवक आहे. त्याची भूमिका साकारणं माझ्यासाठी महत्त्वाचा आणि आव्हानात्मक भाग होता.
* यामी गौतमसोबत प्रथमच आणि श्रद्धा कपूरसोबत पुन्हा एकदा काम करणं किती सोप्पं आणि किती कठीण होतं?
- यामी आणि श्रद्धा या दोघी खूप चांगल्या अभिनेत्री आहेत. दोघीही दिसायला खूप सुंदर आहेत. मी यापूर्वी श्रद्धासोबत काम केलंय, तिच्यामध्ये खूप एनर्जी आहे. पण, यामी माझ्यासाठी एक सरप्राईज पॅके ज होती. चित्रपटाच्या मध्यंतरामध्ये जेव्हा आम्ही कोर्टरूममध्ये रिहर्सल करत होतो, तेव्हा मी तिच्यामुळे खूप प्रभावित झालो. यामी ही खूपच प्रतिभावान अभिनेत्री आहे.
* हैदर आणि उडता पंजाब नंतर सामाजिक संदेश देणारा हा तुझा तिसरा चित्रपट आहे. तू लोकांचा प्रतिनिधी म्हणून समस्या मांडण्यासाठी उभा राहिला आहेस का?
- एक कलाकार म्हणून मी स्वत:ला गृहित धरू शकत नाही की, हे सगळं जे काय होत आहे त्यासाठी मी जबाबदार आहे. कंगना राणौतने अशातच केलेल्या वक्तव्याशी मी सहमत नाही. कारण, प्रत्येकाचे आपापले मत असते. मी फक्त एवढेच म्हणेन की, जर तुमच्या मनातील आवाज जर म्हणत असेल की, तुम्ही एखाद्या व्यक्तीला जगासमोर अभिनयाच्या माध्यमातून आणू शकता तर तुम्ही ते नक्कीच केलं पाहिजे. फक्त एवढेच की, प्रत्येक कलाकृतीचा आदर झाला पाहिजे. कलाकारांच्या कष्टाचा मान ठेवला पाहिजे.
* अजून काही विषय आहेत ज्यावर तुला चित्रपट करायला आवडतील? तुला कोणत्या गोष्टींचा जास्त त्रास होतो?
- तसे तर बरेच विषय आहेत. जेव्हाही मी माझ्या घराच्या खिडकीच्या बाहेर बघतो, तेव्हा पूर्ण बीचवर प्लास्टिक बॅग्ज पडलेल्या असतात. वाईट वाटते. पण, मी खुश आहे की, आता प्लास्टिक बॅग्जवर बंदी आणली आहे. आपण प्रयत्न केला आणि त्यात यशही मिळवले. त्याशिवाय शेतकरी आत्महत्या हा विषयही खूप मोठा आहे. पर्यावरणातील बदल हा देखील खूप मोठा विषय आहे.