‘रूही’तून मिळणार हॉरर कॉमेडीची ट्रीट!
By अबोली कुलकर्णी | Published: March 7, 2021 06:00 AM2021-03-07T06:00:44+5:302021-03-11T19:20:12+5:30
११ मार्च रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘रूही’ चित्रपटातून राजकुमार राव प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यानिमित्ताने त्याच्याशी केलेली ही हितगुज..
क्वीन, सिटी लाइट्स, ट्रॅप्ड, न्यूटन अशा हरतऱ्हेच्या चित्रपटात काम करणारा हरहुन्नरी अभिनेता म्हणजेच राजकुमार राव. रोमँटिक, बायोपिक, कॉमेडी, हॉरर अशा अभिनयाच्या प्रत्येक वाटेवर चालणारा हा अष्टपैलू अभिनेता. ११ मार्च रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘रूही’ चित्रपटातून राजकुमार राव प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यानिमित्ताने त्याच्याशी केलेली ही हितगुज...
१. रूही चित्रपटात तुझी भूमिका कशी आहे?
- या चित्रपटात मी भवरा हे पात्र साकारतोय. भवरा हा रूहीच्या प्रेमात पडतो. मात्र, रूही हिच्यात एक चेटकीण देखील असते. कहाणी पुढे सरकत असताना भवरा कसा घटनांमध्ये अडकत जातो आणि त्यातून तो कसा बाहेर पडतो, हे सर्व पडद्यावर पाहणेच प्रेक्षकांना धम्माल अनुभव देणारे आहे.
२. ‘रूही’च्या कथानकात अशी कोणती गोष्ट आहे जिने तुला प्रभावित केले?
- रूही हा चित्रपट एक हॉरर कॉमेडी आहे. यापूर्वी मी स्त्री हा हॉरर कॉमेडी चित्रपट केला होता. स्त्री चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे या चित्रपटाची ऑफर येताच मी ती स्विकारली. मला हॉरर कॉमेडी याप्रकारच्या चित्रपटात काम करायला खुप आवडतं.
३. वरूण आणि जान्हवीसोबत सेटवर वातावरण कसे होते?
- सेटवर आम्हा सर्वांमध्ये खुप मस्ती, धम्माल चालायची. वरूण आणि जान्हवी दोघेही माझे खुप चांगले मित्र आहेत तसेच उत्कृष्ट कलाकार आहेत. आम्ही सर्वांनी चित्रपटावर खूप मेहनत घेतली आहे.
४. ‘स्त्री’नंतर पुन्हा एकदा हॉरर कॉमेडी...काय वाटते प्रेक्षकांच्या प्रतिसादाबाबत?
- आम्ही खुप उत्सुक आहोत. आम्हाला वाटते की, प्रेक्षकही चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक असतील. थिएटरमध्ये जाताना फक्त मास्क घालून जा आणि ती धम्माल अनुभवा.
५. दिग्दर्शक हार्दिक मेहता यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?
- क्वीन, टॅप्ड चित्रपटांपासून मी हार्दिक यांना ओळखतो. ते माझे चांगले मित्र आहेत. कोणत्याही प्रोजेक्टवर ते खूप मेहनत घेतात. त्यांच्याकडून बरंच शिकायलाही मिळतं.