"आधी 10 लाख रु भरा", श्रवण कुमार यांचे पार्थिव देण्यास रुग्णालयाने दिला होता नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 02:58 PM2021-04-24T14:58:42+5:302021-04-24T15:04:21+5:30
श्रवण यांना कोरोनाची लागण होण्याच्या काही दिवस आधी ते कुंभमेळ्याला गेले होते. त्यांच्या मुलानेच इंडियन एक्सप्रेसशी बोलताना याविषयी सांगितले.
संगीतकार नदीम श्रवण या जोडीनं एकेकाळी बॉलिवूड गाजवलं होतं. श्रावण कुमार राठोड यांचे २२ एप्रिल रोजी निधन झाले. श्रावण राठोड यांना कोरोनाची लागण झाली होती. ज्यामुळे त्यांना एस.एल. रहेजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.त्यांना हृदयविकार तसेच फुप्फुसाचाही त्रास होता. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. सर्व प्रयत्नानंतरही त्यांचे प्राण वाचवण्यात अपयश आले.
त्यांच्या निधनाच्या बातमीने बॉलिवूड विश्वात शोककळा पसरली आहे. दरम्यान, संगीतकाराचे पार्थिव अद्याप कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आले नाही. एस.एल. रहेजा रुग्णालयाने कुटुंबाला १० लाख रुपयांचे बिल एडव्हान्समध्ये भरण्यास सांगितले होते. आधी बिल भरा नंतरच पार्थिव कुटुंबाला सोपवण्यात येईल असे सांगण्यात आले होते. श्रावण यांच्याकडे विमा पॉलिसी होती. ही धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर घडलेल्या प्रकरणाबाबत श्रावण यांच्या कुटुंबियांकडून आतापर्यंत कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.
श्रवण यांच्या निधनानंतर एकिकडे संपूर्ण बॉलिवूडला धक्का बसला आहे. तर दुसरीकडे त्यांच्या कुटुंबीयांनाही या धक्क्यातून सावरणं कठीण झालं आहे. एवढंच नाही तर श्रवण राठोड यांच्यावर अंतिम संस्कार होण्याआधी त्यांची पत्नी आणि मुलगा त्यांचं अंतिम दर्शनही घेऊ शकणार नाहीत अशीही माहिती समोर आली होती. श्रवण राठोड यांची पत्नी आणि मुलगा या दोघांनाही करोनाची लागण झाल्यानं त्या दोघांनाही अंधेरी येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे आणि ते करोनाशी लढा देत आहेत.
संगीतकार श्रवण राठोड यांना कोरोनाची लागण होण्याआधी गेले होते कुंभमेळ्याला, मुलाने दिली माहिती
श्रवण यांना कोरोनाची लागण होण्याच्या काही दिवस आधी ते कुंभमेळ्याला गेले होते. त्यांच्या मुलानेच इंडियन एक्सप्रेसशी बोलताना याविषयी सांगितले. त्यांचा मुलगा संजय राठोडने सांगितले, माझे आई-वडील काही दिवसांपूर्वी हरिद्वार येथील कुंभमेळ्याला गेले होते. माझी आई भाऊ, मी आम्ही सगळ्यांनाच कोरोनाची लागण झाली आहे. मी आणि माझी आई रुग्णालयात असून माझा भाऊ घरी क्वारंटाईन आहे. त्याला वडिलांचे अंत्यसंस्कार करण्याची परवानगी देण्यात आली. पण मला आणि आईला त्यांचे शेवटचे दर्शनदेखील घेता आले नाही.
९०च्या दशकात नदीम-श्रवण या जोडीने सुपरहिट गाणी दिली होती. चित्रपट आशिकीमधील त्यांच्या संगीताने सगळ्यांना भुरळ घातली होती. ‘साजन’, ‘साथी’, ‘दिवाना’, ‘फुल और कांटे’, ‘राजा’, ‘धडकन’, ‘राज’, ‘दिलवाले’, ‘राजा हिंदुस्तानी’ अशा अनेक चित्रपटांसाठी संगीत दिले होते.