राहुल बोसकडून दोन केळींसाठी 442 रूपये वसूल करणा-या हॉटेलला दणका!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2019 10:39 AM2019-07-28T10:39:43+5:302019-07-28T10:40:01+5:30
गेल्या काही दिवसांपासून अभिनेता राहुल बोस चांगलाच चर्चेत आहे. या चर्चेचे कारण म्हणजे, त्याचा एक व्हिडीओ. चंदीगडच्या एका पंचतारांकित ...
गेल्या काही दिवसांपासून अभिनेता राहुल बोस चांगलाच चर्चेत आहे. या चर्चेचे कारण म्हणजे, त्याचा एक व्हिडीओ. चंदीगडच्या एका पंचतारांकित हॉटेलामध्ये त्याने दोन केळी मागवल्या आणि या हॉटेलने चक्क 442 रूपयांचे बिल फाडले. याविरोधात आवाज उठवत राहुलने एक व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ काहीच तासांत व्हायरल झाला होता. त्यानंतर प्रशासनानेही या व्हिडीओची गंभीर दखल या हॉटेलवर कारवाई केली होती. ताज्या माहितीनुसार, उत्पादन शुल्क विभागाने या हॉटेलवर कारवाई करत जवळपास 50 पट अधिक दंड ठोठावला आहे.
राहुलने चंदीगडच्या पंचतारांकित जेडब्ल्यू मॅरिएट्स हॉटेलमध्ये न्याहारीत दोन केळी मागवल्या होत्या. मात्र, या केळींचे बिल पाहून त्याला धक्काच बसला होता. हॉटेलने दोन केळींसाठी तब्बल 442 रुपयांचे बिल फाडले होते. आता दोन केळींसाठी मनमानी पैसे आकारणा-या या हॉटेलवर उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे. या हॉटेलवर तब्बल 25000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. इतकंच नाही ,तर उत्पादन शुल्क आणि कर विभागाने जेडब्ल्यू मॅरिएट्सकडील विक्रीची सर्व कागदपत्र जप्त केली आहेत. तसेच, हे हॉटेल नियमितपणे कर भरते की नाही त्याचाही तपास केला जात आहे. ताजी फळे ही करमुक्त वस्तूंमध्ये येतात, त्यामुळे केळी इतकी महाग का विकली? याबाबत हॉटेल प्रशासनाला जाब विचारण्यात आला आहे.
You have to see this to believe it. Who said fruit wasn’t harmful to your existence? Ask the wonderful folks at @JWMarriottChd#goingbananas#howtogetfitandgobroke#potassiumforkingspic.twitter.com/SNJvecHvZB
— Rahul Bose (@RahulBose1) July 22, 2019
काय आहे प्रकरण
राहुल बोस चंदीगडच्या जेडब्ल्यू मॅरिएट्स या 5 स्टार हॉटेलात मुक्कामाला होता. या मुक्कामातील एक अनुभव राहुलने सोशल मीडियावर शेअर केला होता. राहुलने हॉटेलमध्ये वर्कआऊट करत होता. यादरम्यान त्याने स्वत:साठी दोन केळी मागवल्या. वेटर लगेच दोन केळी घेऊन आला. पण या दोन केळींचे बिल पाहून राहुलचे डोळे पांढरे झालेत. होय, राहुलने केवळ दोन केळी खाल्ली. या दोन केळींसाठी त्याला 442 रूपये मोजावे लागलेत.
राहुलचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला होता. शिवाय यानंतर लक्झरी हॉटेलातील मनमानी बिल वसूलीवर वेगवेगळी चर्चा सुरु झाली होती. अनेक युजर्सनी यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या होत्या. ‘तू शेक मागवले असते तर त्याचे बिल आयफोन इतके असते,’ असे एका युजरने गमतीत लिहिले होते. ‘ राहुल, तू खाल्लेली केळी त्यांनी ऑस्ट्रेलियातून मागवली होती, म्हणून त्यांनी इतके बिल फाडले,’ असे एका युजरने लिहिले होते.