HouseFull 4 ने ओपनिंग डे पेक्षा चौथ्या दिवशी केली बंपर कमाई, आतापर्यंत केले इतके कलेक्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2019 18:30 IST2019-10-29T18:30:00+5:302019-10-29T18:30:02+5:30
हाऊसफुल 4 या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चौथ्या दिवशी पहिल्या दिवसापेक्षा देखील जास्त कमाई केली आहे.

HouseFull 4 ने ओपनिंग डे पेक्षा चौथ्या दिवशी केली बंपर कमाई, आतापर्यंत केले इतके कलेक्शन
हाऊसफुल 4 या चित्रपटाची गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आल्यानंतर हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात होते. हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चौथ्या दिवशी पहिल्या दिवसापेक्षा देखील जास्त कमाई केली आहे.
हाऊसफुल 4 या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 19.08 कोटीची कमाई केली होती. आता या चित्रपटाने चौथ्या दिवशी तब्बल 34.56 कोटी इतके कलेक्शन बॉक्स ऑफिसवर केले आहे. ट्रेड ॲनालिस्ट तरण आदर्श यांनी सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली आहे. त्यांनी एक ट्वीट करून सांगितले आहे की, हाऊसफुल 4 ने बॉक्स ऑफिसवर चौथ्या दिवशी खूप चांगली कमाई केली असून दिवाळीच्या सुट्ट्यांचा या चित्रपटाला खूपच चांगला फायदा झाला आहे. शुक्रवारी या चित्रपटाने 19.08 कोटी, शनिवारी 18.81 कोटी, रविवारी 15.33 कोटी इतकी बॉक्स ऑफिसवर कमाई केली होती. या चित्रपटाने सोमवारी 34.56 कोटींचा व्यवसाय बॉक्स ऑफिसवर केला असून चार दिवसांत या चित्रपटाने 87.78 कोटी इतके कलेक्शन केले आहे.
हाऊसफुल 4 या चित्रपटात अक्षय कुमार, कृती सेनन, बॉबी देओल, रितेश देशमुख, कृती खरबंदा, पूजा हेगडे यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटात आपल्याला दोन वेगवेगळे काळ पाहायला मिळत आहेत. त्यामुळे सगळ्याच कलाकारांचे दोन वेगवेगळे लूक पाहायला मिळत आहेत.
‘हाऊसफुल 4’चे ‘शैतान का साला’ हे गाणे चित्रपट प्रदर्शित व्हायच्या आधीच हिट झाले होते. हे गाणे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. या गाण्यानंतर सोशल मीडियावर #TheBalaChallenge या चॅलेंजनेही धुमाकूळ घातला होता. अनेक कलाकारांनी आतापर्यंत हे चॅलेंज पूर्ण केले आहे. अक्षय कुमारने सर्वप्रथम हे चॅलेंज सुरू केले होते आणि सेलिब्रिटींपासून चाहत्यांपर्यंत सगळ्यांनाच या चॅलेंजने वेड लावले होते.