सुशांतच्या निधनानंतर कशी सावरली अंकिता? पती विकी जैनने पहिल्यांदाच केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 11:23 AM2023-02-16T11:23:18+5:302023-02-16T11:24:24+5:30
त्या कठीण प्रसंगावर अंकिताचा पती विकी जैन पहिल्यांदाच माध्यमांसमोर बोलला आहे.
अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या (Sushant Singh Rajput) अकस्मात निधनानंतर सर्वांनाच धक्का बसला होता. सुशांत आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) बरेच वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. मात्र काही कारणाने दोघांच्या वाटा वेगळ्या झाल्या. सुशांतने आत्महत्येचं पाऊल उचलल्यानं अंकिता अनेक दिवस सदम्यात होती. या कठीण प्रसंगात तिला घरच्यांचा आणि तिच्या सासरच्यांचा पाठिंबा मिळाला. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अंकिताने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.
सुशांतसोबतचं नातं संपल्यानंतर अनेक वर्षांनी अंकिता लोखंडे पुन्हा प्रेमात पडली होती. व्यावसायिक विकी जैनसह ती रिलेशनशिपमध्ये आली. मात्र जून २०२० मध्ये सुशांतच्या आकस्मिक निधनाने तिला जबर धक्का बसला. या दु:खातून बाहेर येण्यास अंकिताला तिच्या कुटुंबाने मदत केली. तसेच विकीच्या कुटुंबियांनीही समजून घेतल्याचं ती म्हणाली. 'बॉलिवूड बबल'ला दिलेल्या मुलाखतीत अंकिता म्हणाली, 'जे काही आमच्यात घडलं त्याच्या दोन वर्षांनंतर माझा प्रेमावरून विश्वास उडाला नव्हता. पण माझ्या आयुष्यात प्रेम पुन्हा येईल असा आत्मविश्वास मला होता. माझ्यासाठी एखादी व्यक्ती नक्कीच असेल जी माझी स्वप्नं पूर्ण करेल, जो माझ्याशी लग्न करेल, असं मला कायम वाटायचं. मी प्रेमाला कधीच नकार देऊ शकले नाही. माझ्यासाठी एखादी व्यक्ती नक्कीच आहे, यावर मला कायम विश्वास होता.'
त्या कठीण प्रसंगावर विकी म्हणाला, 'आपण कधी कल्पनाही केली नसेल अशा काही परिस्थितींना तुम्हाला सामोरं जावं लागतं. जर तुम्ही एकमेकांना कमिटमेंट दिली असेल तर तुम्ही आपोआप एक टीम बनता असा मला विश्वास वाटतो. त्यावेळी जे काही घडत होतं, त्यात ती एकटी होती. मी सुद्धा तिच्या पाठिशी तिथे खंबीरपणे उभा होतो. सुशांतच्या निधनानंतर वेगवेगळी माहिती समोर येत होती. अंकिताने सुशांतच्या कुटुंबियांची भेट घेतली. फक्त यासाठी नाही की सुशांत आणि ती रिलेशनशिपमध्ये होते मात्र एक माणूस म्हणूनही तिने ते करणं गरजेचं होतं.'
अंकिताने डिसेंबर २०२१ मध्ये बॉयफ्रेंड विकी जैनसोबत लग्नगाठ बांधली. अगदी धुमधडाक्यात हा लग्नसोहळा पार पडला. लग्नात अंकिताने प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राने डिझाईन केलेला लेहेंगा परिधान केला होता. अंकिताचा ब्रायडल लुक चाहत्यांच्या पसंतीस पडला होता.