हृतिक रोशनला ऑफर झाला ‘हा’ २०० कोटींचा चित्रपट!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2019 06:00 AM2019-02-20T06:00:00+5:302019-02-20T06:00:02+5:30
होय, ‘मोहेंजोदडो’नंतर हडप्पा संस्कृतीवरचा आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पुन्हा एकदा सिंधू संस्कृती आणि हडप्पाची कथा पडद्यावर आणण्याची तयारी सुरु झालीय.
ऐतिहासिक विषयाला वाहिलेल्या चित्रपटांचा ट्रेंड जुना आहे. बॉलिवूडमध्ये आत्तापर्यंत अनेक ऐतिहासिक चित्रपट आलेत. आजही हा ‘सिलसिला’ थांबलेला नाही. काही वर्षांपूर्वी ‘मोहेंजोदडो’ची कथा पडद्यावर दिसली होती. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित या चित्रपटात हृतिक रोशन व पूजा हेगडे लीड रोलमध्ये होते. सिंधू संस्कृतीवर आधारित हृतिकचा हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर फार कमाल दाखवू शकला नाही. पण याऊपरही पुन्हा एकदा सिंधू संस्कृती आणि हडप्पाची कथा पडद्यावर आणण्याची तयारी सुरु झालीय. होय, ‘मोहेंजोदडो’नंतर हडप्पा संस्कृतीवरचा आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
रिलायन्स एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली येऊ घातलेल्या या चित्रपटाचा बजेट २०० कोटींच्या घरात असल्याचे कळतेय. हा चित्रपट ‘बेस्ट सेलर’ लेखक विनीत वाजपेयी यांच्या ‘Harappa Trilogy’ या पुस्तकावर आधारित असल्याचे कळतेय. रिलायन्सने या पुस्तकाचे सगळे हक्क विकत घेतले आहेत. खुद्द विनीत यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटासाठी पुन्हा एकदा हृतिक रोशनशी संपर्क साधण्यात आल्याचीही बातमी आहे. हृतिकशिवाय अन्य २८ कलाकार यात दिसतील.
हडप्पा संस्कृतीवरच्या या चित्रपटाची कथा सिंधू संस्कृती आणि मोहेंजोदडोपासून सुरु होईल आणि वाराणसी, गुडगाव आणि पॅरिसपर्यंत पोहोचेल. चित्रपटात दोन कथा समांतर गोवल्या जातील. एकीकडे हडप्पा तर दुसरीकडे आजचे वाराणसी दाखवले जाईल. सिंधू संस्कृतीच्या -हासापासून तर सरस्वती नदी लुप्त होण्यापर्यंतची अनेक रहस्येही या कथेचा भाग असतील. अद्याप या चित्रपटाची अधिकृत घोषणा झालेली नाही. पण लवकरच ही घोषणा होण्याची शक्यता आहे.