कमरेला पट्टा अन् हातात कुबड्या; हृतिक रोशनला नेमकं झालं तरी काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2024 21:46 IST2024-02-14T21:46:05+5:302024-02-14T21:46:55+5:30
हृतिक रोशनची अवस्था पाहून चाहते चिंतेत; अभिनेत्याला काय झालं?

कमरेला पट्टा अन् हातात कुबड्या; हृतिक रोशनला नेमकं झालं तरी काय?
बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन अभिनयाबरोबरच त्याच्या फिटनेस आणि डान्ससाठी ओळखला जातो. हृतिक रोशनचा फायटर सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. या सिनेमामुळे हृतिक चर्चेत होता. पण, सध्या मात्र हृतिक एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. हृतिकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक फोटो पोस्ट केला आहे. त्याचा हा फोटो पाहून हृतिकचे चाहते चिंतेत आहेत.
हृतिकने शेअर केलेल्या या फोटोमध्ये त्याच्या कमरेला पट्टा लावलेला दिसत आहे. याशिवाय तो कुबड्यांच्या आधारे उभा असल्याचंही फोटोत पाहायला मिळत आहे. हा फोटो पाहून हृतिकला नक्की काय झालंय? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. हा फोटो शेअर करत हृतिकने काय घडलं ते सांगितलं आहे. हृतिक मंगळवारी(१३ फेब्रुवारी) सकाळी उठला तेव्हा त्याच्या शरीराच्या खालच्या भागातील नसा खेचल्यासारख्या जाणवल्या. त्यामुळे त्याला कुबड्यांचा आधार घ्यावा लागला.
हा फोटो शेअर करत त्याने त्याच्या आजोबांचाही एक किस्सा सांगितला आहे. हृतिक म्हणतो, "तुमच्यापैकी किती लोकांना कुबड्या किंवा व्हिलचेअरचा आधार घ्यावा लागला आहे? आणि त्यावेळी तुम्हाला काय वाटलं? मला आठवतंय की माझ्या आजोबांनी एअरपोर्टवर व्हिलचेअरवर बसण्यास नकार दिला होता. कारण, अनोळखी लोकांसमोर त्यांना स्वत:ला कमजोर दाखवायचं नव्हतं. तेव्हा मी त्यांना म्हणालो होतो की ही एक जखम आहे. याचा तुमच्या वयाशी काहीही संबंध नाही. यामुळे तुमची जखम लवकर बरी होईल. पण, हा विचार करून मला दु:ख होतं की शरमेमुळे ते स्वत:ला मजबूत दाखवत होते. मला या गोष्टीचा अर्थ समजला नव्हता. त्यांना वयामुळे नाही तर जखम झाल्यामुळे व्हील चेअरची गरज असल्याचं मला वाटलं होतं. पण, व्हिलचेअरचा वयाशी काहीही संबंध नसतो. तेव्हा त्यांनी अनोळखी लोकांसमोर व्हिलचेअर वापरण्यास नकार दिला. त्यामुळे उपचारासही विलंब झाला."
हृतिकच्या या पोस्टमुळे त्याच्या चाहत्यांना अभिनेत्याची चिंता सतावत आहे. या पोस्टवर कमेंट करतात चाहत्यांनी हृतिकबद्दल काळजी व्यक्त केली आहे. दरम्यान, अलिकडेच प्रदर्शित झालेला हृतिकचा फायटर सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या सिनेमात हृतिकने फायटर पायलटची भूमिका साकारली आहे.