'हम आपके है कौन'चा सीक्वल सलमान-माधुरीशिवाय बनणार? निर्माते म्हणाले- "आता नव्या चेहऱ्यांना..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 16:40 IST2025-04-23T16:37:24+5:302025-04-23T16:40:57+5:30
बॉलिवूडचा ‘दबंग’ अर्थात अभिनेता सलमान खान याने आजवर अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.

'हम आपके है कौन'चा सीक्वल सलमान-माधुरीशिवाय बनणार? निर्माते म्हणाले- "आता नव्या चेहऱ्यांना..."
Hum Aapke Hain Koun Sequel Update: बॉलिवूडचा ‘दबंग’ अर्थात अभिनेता सलमान खान (Salman Khan) याने आजवर अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. सलमान खानने मोठ्या पडद्यावर अनेकदा ‘प्रेम’ साकारला. अनेक चित्रपटांमध्ये त्याच्या पात्राचे नाव प्रेम होते. इतकंच काय तर, त्याने ‘प्रेम’ साकारला आणि ते चित्रपट तुफान गाजले. यापैकीच एक चित्रपट ‘हम आपके है कौन’ चित्रपट होता. १९९४मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात सलमान खान आणि माधुरी दीक्षितची (Madhuri Dixit)जोडी खूप गाजली. या चित्रपटात त्यांनी प्रेम आणि निशा या भूमिका साकारल्या होत्या, ज्या अजरामर ठरल्या. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन आता ३१ वर्षे पूर्ण झाली आहे. याच निमित्ताने चित्रपटाचे दिग्दर्शक सूरज बडजात्या यांनी सीक्वलविषयी अपडेट दिली आहे.
सूरज बडजात्या यांनीच सलमान आणि माधुरीचा ‘हम आपके है कौन’ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. त्यांचा हा चित्रपट १९९४मध्ये सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. अवघ्या ६ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने १२८ कोटींची कमाई केली होती. आता या चित्रपटाच्या सिक्वेलची तयारी सुरू असल्याचे बोलले जात आहे. मात्र, या सिक्वेलमध्ये अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित दिसणार नसल्याचे बोलले जात आहे. यावर स्वतः सूरज बडजात्या यांनी अपडेट दिली आहे.
सलमान खान आणि सूरज बडजात्या यांनी अनेक चित्रपटांसाठी एकत्र काम केले आहे. यात ‘मैंने प्यार किया’, ‘हम साथ-साथ हैं’, ‘हम आपके हैं कौन’, ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटांचा समावेश आहे. यातील काही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर तुफान कल्ला केला होता. दिग्दर्शकाशी इतकी जवळीक असताना देखील सलमान खान याला सीक्वलमध्ये घेतले जाणार नाही. नुकतीच सूरज बडजात्या यांनी 'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत या चित्रपटाच्या सीक्वलमध्ये माधुरी आणि सलमानला घेणार नसल्याचे म्हटले आहे. त्यांनी आधीच या सीक्वलबाबतीत काही मोठे निर्णय घेतले असल्याचे स्पष्ट केले आहे. या चित्रपटात सगळे नवे चेहरे दिसतील, असा निर्णय त्यांनी घेतला आहे. मात्र, या चित्रपटाचा सीक्वल कधी बनणार आणि त्यात कोण दिसणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
जुने कलाकार का नकोत?
आपल्या या निर्णयावर बोलताना सूरज बडजात्या म्हणाले की, "अनेकदा लोक चांगल्या कलाकारांपेक्षा चांगल्या कथांना प्राधान्य देतात. त्यामुळे जर सीक्वेल करायचा असेल, तर नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल. सलमान आणि माधुरी हे चांगले कलाकार आहेत. त्यांच्यासाठी योग्य कथा हाती आली तर आम्ही पुन्हा एकत्र नक्की काम करू. मात्र, एक चांगली कथा सगळ्यात महत्त्वाची असते, यावर माझा पूर्ण विश्वास आहे.". असा खुलास त्यांनी केला.