"तिथे छान झोपायचो आणि आता...", सलमान खानने तुरुंगात घालवलेल्या दिवसांबद्दल केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 10:22 IST2025-02-11T10:22:25+5:302025-02-11T10:22:57+5:30
Salman Khan: अलिकडेच सलमान पुतण्या अरहान खानच्या पॉडकास्ट शोमध्ये दिसला आणि त्याचे आयुष्यातील अनुभव शेअर केले. तो दिवसातून फक्त दोन तास झोपतो, असा खुलासा सलमानने केला आहे.

"तिथे छान झोपायचो आणि आता...", सलमान खानने तुरुंगात घालवलेल्या दिवसांबद्दल केला खुलासा
सलमान खान (Salman Khan) तीन दशकांहून अधिक काळ सिनेइंडस्ट्रीचा भाग आहे आणि त्याने आतापर्यंत डझनभर हिट चित्रपट दिले आहेत. सलमान पटकथाकार सलीम खान यांचा मुलगा आहे, पण त्याने स्वतःच्या हिमतीवर इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण केले आहे. अलिकडेच सलमान पुतण्या अरहान खानच्या पॉडकास्ट शोमध्ये दिसला आणि त्याचे आयुष्यातील अनुभव शेअर केले. तो दिवसातून फक्त दोन तास झोपतो, असा खुलासा सलमानने केला आहे. तसेच त्याने लोकांना कठोर परिश्रम करण्याचा सल्लाही दिला. यासोबतच त्याने आपल्या तुरुंगातील दिवसांबद्दलही सांगितले. तो म्हणाला की, त्या दिवसात तो खूप झोपला होता.
सलमानने सांगितले की, तो दिवसातून फक्त दोन तास झोपतो आणि महिन्यातून एकदाच ७-८ तासांची झोप घेतो. कधी-कधी असं होतं की सेटवर शॉट तयार होत असताना मधल्या काही मिनिटांसाठी तो झोपी जातो. सलमानने जीवनातील कठोर परिश्रम आणि शिस्तीचे महत्त्व सांगितले. तो म्हणाला की, केवळ बहाणे केल्याने यशाच्या मार्गात अडथळे निर्माण होतात. मी थकलो आहे. नाही, उठा... तुम्ही कितीही थकला असाल तरीही. झोपू नका. असे काहीतरी करा ज्यामुळे तुम्हाला थकवा येईल आणि मग तुम्हाला शांत झोप मिळेल. मी एक किंवा दीड ते दोन तास झोपतो आणि कधीकधी महिन्यातून एकदा मी ७ तास झोपतो. हिट अँड रन प्रकरणामुळे सलमान तुरुंगात राहिला होता.
''तुरुंगात असताना मी खूप झोपलो''
सलमान पुढे म्हणाला, 'कधीकधी मला शॉट्समध्ये पाच मिनिटांचा ब्रेक मिळतो. तेव्हा मी खुर्चीवर झोपी जातो. एक अशी जागा जिथे मी काहीही करू शकत नाही...जसे की मी तुरुंगात होतो तेव्हा मी खूप झोपलो होतो कारण मी तिथे काहीही करू शकत नव्हतो. फ्लाईटमध्ये गडबड असतानाही मी आरामात झोपतो कारण माझ्यासाठी तिथे काहीच काम नसते. म्हणून जेव्हा जेव्हा कुटुंब किंवा कामाचा प्रश्न येतो तेव्हा तुम्ही जे काही कष्ट करत आहात, जे काही करत आहात ते दिसले पाहिजे. तुम्ही तुमच्या कामाच्या, मित्रांच्या आणि कुटुंबाच्या पाठीशी नेहमी उभे राहा.
'सिकंदर'मध्ये दिसणार सलमान
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर सलमान खान आता एआर मुरुगदासच्या 'सिकंदर' चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट यावर्षी ईदला रिलीज होणार असून त्यात सलमानसोबत रश्मिका मंदाना आहे. डिसेंबर २०२४ मध्ये सलमानच्या वाढदिवशी चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला होता, ज्याला जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता.