बॉलिवूडमधील ही प्रसिद्ध अभिनेत्री होती सैन्यात, एका अपघातामुळे सोडले हे क्षेत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2019 04:23 PM2019-11-04T16:23:50+5:302019-11-04T16:26:22+5:30
ही अभिनेत्री पूर्वी सैन्यात होती. पण एका अपघातामुळे तिने या क्षेत्रात करियर करायचे नाही असे ठरवले. तिनेच एका मुलाखतीच्या दरम्यान ही गोष्ट सांगितली होती.
देव डी, साहेब बीवी और गँगस्टर अशा चित्रपटांतून चाहत्यांचा मनाचा ठाव घेणारी अभिनेत्री माही गिल अभिनयक्षेत्रात येण्यापूर्वी सैन्यात होती असे तुम्हाला कोणी सांगितले तर तुम्हाला यावर विश्वास बसेल का? हो, हे खरे आहे. माही सैन्यात होती. पण एका अपघातामुळे तिने या क्षेत्रात करियर करायचे नाही असे ठरवले. तिनेच एका मुलाखतीच्या दरम्यान ही गोष्ट सांगितली होती.
साहब बीवी गैंगस्टर 3 या चित्रपटातील माहीच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या दरम्यान तिने नवभारत टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, मी आज अभिनेत्री नसती तर मी आज सैन्यात एखाद्या चांगल्या पदावर असते. मी चंदिगडमध्ये लहानाची मोठी झाली आहे. माझ्या घरातील वातावरण अगदी सामान्य होते. माझी आई कॉलेजमध्ये शिकवत होती तर माझे वडील सरकारी ऑफिसर होते. मला कधीच अभिनेत्री बनायचे नव्हते. मला आर्मीमध्ये जायचे होते आणि त्यासाठी माझी निवड देखील झाली होती. पण माझे ट्रेनिंग सुरू असताना माझ्यासोबत एक अपघात झाला आणि त्यामुळे मला आर्मीत करियर करता आले नाही.
या अपघाताविषयी माहीने या मुलाखतीत सांगितले होते की, चेन्नई विमानतळावर मी पॅरासेलिंगचे ट्रेनिंग घेत होते. पण त्यावेळी मी पडले होते. या अपघातानंतर माझ्या घरातील सगळेच प्रचंड घाबरले होते आणि त्यांना मला घरी पुन्हा बोलावून घेतले. मी पॅराशूटमधून खाली पडले, त्यावेळी मला पडण्यापेक्षा जास्त भीती एका वेगळ्याच गोष्टीची वाटत होती. त्यावेळी माझ्या खिशात पाच प्रेमपत्रं होती. ती माझ्या प्रियकरासाठी मी लिहिली होती. पण त्याला मी ती पोस्ट करू शकले नव्हते. ही प्रेमपत्रं माझ्या कोचने पाहिली तर मला प्रचंड ओरडा खायला लागला असता. तो अपघात झाला नसता तर मी आज सैन्यात असते.
माही गिल हिने 2003 मध्ये अमितोज मानच्या 'हवाएं' या पंजाबी चित्रपटामधून करिअरला सुरूवात केली होती. देव डीनंतर साहेब बीवी और गँगस्टर , दबंग, पान सिंग तोमर अशा अनेक चित्रपटांत ती झळकली.