IFFI 2022: ‘मी तिथे असतो तर स्टेजवर जाऊन त्याला...’, नदव लॅपिडच्या वक्तव्यावर अनुपम खेर संतापले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 05:52 PM2022-11-29T17:52:26+5:302022-11-29T17:52:39+5:30
The Kashmir Files Controversy: IFFIच्या ज्युरी प्रमुखाने ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाला 'अश्लील' आणि 'प्रपोगंडा' म्हटले आहे.
Anuapm Kher On Nadav Lapid Statement: गोवा येथे पार पडलेल्या 53व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात(IFFI 2022) ज्युरी प्रमुख नदव लॅपिड यांनी थेट मंचावरून 'द काश्मीर फाइल्स' चित्रपटाला 'अश्लील' आणि 'प्रपोगंडा' म्हटले. यावरुन सध्या मोठा गदारोळ झाला असून, अनेकजण यावर प्रतिक्रिया देत आहेत. आता स्वतः या चित्रपटातील अभिनेते अनुपम खेर यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.
एका हिंदी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अनुपम खेर म्हणाले की, 'ज्युरी प्रमुख नदव लॅपिडने जेव्हा चित्रपटाती टीका केली, तेव्हा मी तिथे नव्हतो, अन्यथा मंचावर जाऊन त्याला गप्प केले असते. कोणत्याही चित्रपट निर्मात्याने असे विधान करणे अतिशय अयोग्य आहे. जुरी प्रमुखाचे वक्तव्य पूर्वनियोजित असून एका षड्यंत्राखाली चित्रपटाची बदनामी केली गेली आहे. यातून टूलकिट गँगचा अजेंडा पुढे नेण्यात आला असून, टूलकिट गँग सध्या खूपच खूश आहे,' अशी टीका खेर यांनी केली.
अनुपम खेर पुढे म्हणतात की, 'जे लोक चित्रपट प्रदर्शित होण्याआधी खूश नव्हते, त्यांना खूश करण्यासाठी ज्युरी प्रमुखाने हे वक्तव्य केले आहे. इस्त्रायली चित्रपट निर्मात्याने वक्तव्य करून केवळ काश्मिरी पंडित, हिंदू आणि संपूर्ण मानवतेचा अपमान केला नाही, तर या दुर्घटनेत मारल्या गेलेल्या सर्व लोकांचाही अपमान केला आहे. मी विवेकशी या विषयावर बोललो, चित्रपटासाठी त्याने अनेकांच्या मुलाखती घेतल्या होत्या, त्याने खूप मेहनत केली आहे,' असंही खेर म्हणाले.
इस्रायलचे काउंसिल जनरन कोबी शोशानी काय म्हणाले?
इस्त्रायली चित्रपट निर्मात्याच्या वक्तव्यावर कोबी यांनी जोरदार टीका केली. भारत आणि इस्रायलमधील संबंधांचा हवाला देत कोबी म्हणाले की, त्यांनी अशा प्रकारचे वक्तृत्व टाळायला हवे होते. अशा प्रतिष्ठित व्यासपीठावरील त्यांचे वक्तव्य पूर्णपणे निषेधार्ह आहे. मी 'द काश्मीर फाइल्स' हा चित्रपट पाहिला होता आणि मला हा चित्रपट खूप आवडला. यामध्ये काश्मिरी पंडितांच्या वेदनांचे संपूर्ण तीव्रतेने वर्णन केले आहे. नदाव लॅपिडच्या वक्तव्याशी इस्रायलचा काहीही संबंध नाही, असं ते म्हणाले.