The Kashmir Files : कोणीतरी बोलणं गरजेचं होतं..., ‘द काश्मीर फाइल्स’वर पुन्हा बोलले नादव लॅपिड
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 02:58 PM2022-11-30T14:58:23+5:302022-11-30T15:09:28+5:30
Nadav Lapid: 'द कश्मीर फाईल्स (The Kashmir Files) हा प्रपोगंडा आणि वल्गर चित्रपट आहे', असं नदाव यांनी म्हटलं होतं. आता नादव यांची आणखी एक प्रतिक्रिया चर्चेत आली आहे.
गोव्यात नुकत्याच पार पडलेल्या इफ्फी या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे ज्युरी हेड नादव लॅपिड (Nadav Lapid) यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाबद्दल वक्तव्य केलं आणि देशभरातलं वातावरण तापलं. ‘द काश्मीर फाइल्स’ हा प्रपोगंडा व वल्गर चित्रपट आहे, असं नादव यांनी म्हटलं आणि नादव लॅपिड हे नाव अचानक चर्चेत आलं. त्यांच्या वक्तव्यानंतर ‘द काश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री, अभिनेते अनुपम खेर यांनी नादव यांच्यावर तिखट शब्दांत टीका केली. आता नादव यांची आणखी एक प्रतिक्रिया चर्चेत आली आहे. ‘द काश्मीर फाइल्स’बद्दल केलेल्या वक्तव्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
काय म्हणाले नादव?
YNet ला दिलेल्या मुलाखतीत नादव यांनी ‘द काश्मीर फाइल्स’बद्दल केलेल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले, ‘मी जे काही बोललो ते बोलणं सोपं नव्हतं. कारण मी भारतात पाहुणा आहे. याच देशात आयोजित महोत्सवाचा ज्युरी हेड आहे. अशात याच देशात येऊन असं काही बोलणं सोप्प नव्हतं. पण मी भारतीय नाही. त्यामुळे मला जे बोलायचं होतं तेच मी बोललो. मी तेच बोललो, जे मला बोलायला हवं होतं. मी विचारपूर्वक बोललो. ज्या देशांमध्ये मनातलं ते बोलण्याची क्षमता कमी होत आहे, अशाठिकाणी कुणाला तरी बोलायलाच हवं. जेव्हा मी ‘द काश्मीर फाइल्स’ हा सिनेमा पाहिला तेव्हा मी सुद्धा अस्वस्थ झालो होतो. या विषयावर कोणीही बोलू इच्छित नाही म्हणून मी बोललो. कोणीतरी बोलण्याची गरज होती. माझ्या भाषणानंतर अनेकांनी माझे आभारही मानलेत, असं नादव म्हणाले.
नादव लॅपिड हे पटकथा लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक आहेत. सिनोनिम्स (2019), द किंडरगार्डन टीचर (2014) आणि पुलीसमॅन (2011) या चित्रपटांमुळे नादव लॅपिड यांना विशेष लोकप्रियता मिळाली.
काय म्हणाले होते नादव?
गोव्यातील पणजी येथे आयोजित इफ्फी महोत्सवात इफ्फी ज्युरी हेड व इस्रायली चित्रपट निर्माते नादव लॅपिड यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटावर टीका केली होती. ‘आम्ही सर्व नाराज आहोत. हा चित्रपट आम्हाला ‘प्रपोगंडा, वल्गर ’ वाटला. एवढ्या मोठ्या प्रतिष्ठेच्या चित्रपट महोत्सवासाठी द काश्मीर फाइल्स योग्य नाही. मी व्यासपीठावर माझ्या भावना मोकळेपणाने शेअर करू शकतो. कारण ही एक महत्त्वाची चर्चा आहे आणि ती मोकळेपणानं व्हायला हवी. कला आणि जीवनासाठी ते आवश्यक आहे,’ असं ते म्हणाले होते .