IIFA 2024 : सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाल्यानंतर राणी मुखर्जीने व्यक्त केल्या भावना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2024 06:32 PM2024-09-29T18:32:40+5:302024-09-29T18:34:59+5:30

बॉलिवूडमधील अनेक तारे-तारका या सोहळ्याला उपस्थित होते.

IIFA 2024: Rani Mukerji On Her Film Mrs Chatterjee vs Norway | IIFA 2024 : सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाल्यानंतर राणी मुखर्जीने व्यक्त केल्या भावना

IIFA 2024 : सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाल्यानंतर राणी मुखर्जीने व्यक्त केल्या भावना

यंदाचा IIFA 2024 पुरस्कार सोहळा अबू धाबीमध्ये संपन्न झाला. 27 सप्टेंबरपासून 29 सप्टेंबरपर्यंत हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला.  बॉलिवूडमधील अनेक तारे-तारका या सोहळ्याला उपस्थित होते. बॉलिवूडचा किंग अर्थात शाहरुख खानने आयफा पुरस्कार सोहळ्याचं सूत्रसंचालन केलं. विकी कौशल आणि करण जोहरने त्याची साथ दिली. या पुरस्काराचे नामांकन मिळालं म्हणजे आपल्या कामाची दखल घेतली गेली. तर पुरस्कार मिळाले म्हणजे आपल्या कामाची पोचपावती मिळाली अशी भावना कलाकारांच्या मनात असते. नुकतंच अभिनेत्री राणी मुखर्जीला 'मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे' या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. यानिमित्ताने राणी मुखर्जीने भावना व्यक्त केल्या. 

राणी मुखर्जीच्या 'मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे'  हा सिनेमा चांगलाच गाजला होता. या सिनेमातील राणीच्या अभिनयाचेही विशेष कौतुक झालं. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार स्वीकारताना राणी मुखर्जी म्हणाली, "येथे उभं राहून, इतक्या अद्भुत आणि प्रेमळ प्रेक्षकांसमोर आणि माझ्या सहकलाकारांसमोर हा पुरस्कार मिळवणे खूपच खास आहे. हा माझ्या करिअरमधील सर्वात खास चित्रपटांपैकी एक आहे. IIFA मध्ये हा पुरस्कार मिळणं अधिक खास आहे. कारण यामुळे सिद्ध होतं की 'मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे' ने जागतिक स्तरावर लोकांच्या मनावर ठसा उमटवला. या चित्रपटाच्या यशाने कथा सांगण्याचं अमरत्व आणि मातृत्वाच्या प्रेमाची व मानवी जिद्दीची सार्वत्रिक भाषा याची ताकद सिद्ध केली आहे".


ती पुढे म्हणाली, "एका आईचं तिच्या मुलावर असलेलं प्रेम निःस्वार्थ असतं. निःस्वार्थ प्रेम हा एक मिथक आहे, असं मला वाटायचं, पण माझं स्वत:चं मूल झाल्यावर मी ते अनुभवले. आईचे प्रेम कोणताही कायदा मानत नाही आणि ती कोणावरही दया दाखवत नाही. ती सर्व गोष्टींचा सामना करू शकते आणि तिच्या मुलाच्या मार्गातील कोणतीही अडचण पार करू शकते. कोणत्याही परिस्थितीत तिच्या आणि तिच्या मुलाच्यामध्ये कोणी येऊ शकत नाही. हा पुरस्कार मी सर्व  मातांना समर्पित करते. आई तिच्या मुलांसाठी पर्वत हलवू शकते आणि जगाला एक चांगलं ठिकाण बनवू शकते". यासोबतच राणीने प्रेक्षकांचे आभार मानले.

ती म्हणाली,  "माझ्या चाहत्यांचे मनःपूर्वक आभार. तुमचं निःस्वार्थ प्रेम आणि पाठिंबा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही मला मिळालेल्या प्रत्येक भूमिकेला, प्रत्येक कथेला स्वीकारलं आहे. तुमचा माझ्यावर असलेला विश्वास मला आणखी मेहनत करण्यास प्रवृत्त करतो. आजचा हा क्षण तुमच्या प्रार्थनांमुळे शक्य झाला आहे. तुम्ही नेहमी माझ्या पाठीशी उभे राहिलात, त्यासाठी धन्यवाद".

Web Title: IIFA 2024: Rani Mukerji On Her Film Mrs Chatterjee vs Norway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.