सिनेइंडस्ट्रीपासून दुरावल्यानंतर इमरान खान गेला होता ड्रग्सच्या आहारी, अभिनेता म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 06:36 PM2024-05-29T18:36:10+5:302024-05-29T18:36:32+5:30
Imran Khan : 'जाने तू या जाने ना' अभिनेता इमरान खानने अलीकडेच एका मुलाखतीत खुलासा केला की, लोक म्हणायचे की हा ड्रग्स घेतो. अशा बातम्या वाचून त्याचे कुटुंबीय खूप काळजीत पडले होते.
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच अभिनेता इमरान खान(Imran Khan)ने 'जाने तू या जाने ना' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट सुपरडुपर हिट ठरला आणि त्यासोबतच इमरान खानही रातोरात स्टार झाला. त्यानंतर या अभिनेत्याने बऱ्याच चित्रपटात काम केले. ज्यांना फारसे यश मिळाले नाही. २०१५ मध्ये त्याचा 'कट्टी बट्टी' चित्रपट रिलीज झाल्यानंतर इमरान खान अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीपासून दूर आहे.
यावेळी, इमरान खान त्याच्या मानसिक आरोग्यासंबंधी अनेक समस्यांशी झुंज देत होता आणि गंभीर नैराश्यात होता. दरम्यान, इमरानने पत्नी अवंतिका मलिकसोबत घटस्फोट घेतला. एका मुलाखतीत इमरानने खुलासा केला की, चित्रपटांपासून दूर राहिल्यानंतर त्याला ड्रग ॲडिक्ट म्हटले जात होते. अलिकडेच इमरान खानने इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत मागील काही वर्षांतील त्याच्या अनुभवाबद्दल सांगितले आणि इंडस्ट्रीत सुरुवात केली त्यावेळच्या आठवणींनाही उजाळा दिला. इमरानने खुलासा केला की, “तुम्ही सोशल मीडियावर नसलात तरीही ते वर्तमानपत्रांमुळे तुमच्यापर्यंत पोहोचते. घरी वर्तमानपत्र मिळायचे. माझी आई, काकू आणि त्या पिढीतील लोकांच्या आजही घरी वर्तमानपत्र येते, ते माझ्याबद्दल काय लिहिलंय ते बघून अस्वस्थ व्हायचे. ते म्हणायचे, 'बघ ते तुझ्याबद्दल काय बोलत आहेत? त्यांनी हा फोटो पोस्ट केला आहे ज्यामध्ये तू असा दिसतो आहेस, ते सांगत आहेत की तू ड्रग्ज घेतोस? हे त्रासदायक आहे.
लोक म्हणतात म्हणून ते खरे ठरत नाही...
इमरान पुढे म्हणाला की, त्याला त्याच्या आई वडील आणि कुटुंबाची समजूत काढण्यासाठी त्यांच्यासोबत बसावे लागले आणि एक कॉम्प्लिकेटेड बातचीत करावी लागली. त्याने सांगितले की, इतर लोकांना बोलण्यापासून थांबवू शकत नाही. अभिनेता म्हणाला की, लोक या गोष्टी विचार न करता किंवा परिणाम काय होतील याचा विचार न करता बोलतात, फक्त लोक म्हणतात म्हणून ते खरे ठरत नाही.
इमरान गोष्टींना सामोरे जायला शिकला
इमरानने आता या सर्व गोष्टींना सामोरे जाण्याची स्वतःची पद्धत विकसित केली आहे आणि त्याच्याबद्दल काय लिहिले जात आहे याची त्याला पर्वाही नाही. पण नैराश्याने ग्रासलेले असताना असे झाले नाही. फिल्म कम्पॅनियनला दिलेल्या मुलाखतीत इमरान म्हणाला होता की, "त्या वर्षांमध्ये मी या गोष्टींना सामोरे जाऊ शकलो नाही. मी फार कमी काम करू शकलो होतो. जेव्हा तुम्ही खूप नैराश्याचा सामना करत असाल, तेव्हा सकाळी उठणे आणि दात घासणे, आंघोळ करणे हे एक मोठे काम वाटायचे.
इमरान कलाविश्वात करतोय पुनरागमन?
आता इमरान हळूहळू चित्रपट व्यवसायात पुनरागमन करत आहे. वीर दास यांच्या दिग्दर्शनाखाली बनणाऱ्या पहिल्या चित्रपटात तो काम करणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र याबाबत अधिकृतपणे काहीही जाहीर करण्यात आलेले नाही.