बॉलिवूडमधून ब्रेक घेतल्यानंतर बदललं इमरान खानचं आयुष्य, म्हणाला, "मी Ferrari विकून..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2024 15:56 IST2024-02-06T15:56:31+5:302024-02-06T15:56:58+5:30
इमरानने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बॉलिवूडमधील करियर आणि ब्रेक घेण्यावर भाष्य केलं.

बॉलिवूडमधून ब्रेक घेतल्यानंतर बदललं इमरान खानचं आयुष्य, म्हणाला, "मी Ferrari विकून..."
'जाने तू या जाने ना' या सिनेमामुळे प्रसिद्धी झोतात आलेला आणि पदार्पणातच प्रेक्षकांची मनं जिंकून घेणारा अभिनेता म्हणजे इमरान खान. २००८ साली बॉलिवूडमध्ये दमदार एन्ट्री घेतलेल्या इमरानने अनेक सिनेमांत काम केलं. पण, त्याला फारसं यश मिळालं नाही. २०१५ साली प्रदर्शित झालेला 'कट्टी बट्टी' हा सिनेमा फ्लॉप ठरल्यानंतर त्याने बॉलिवूडमधून ब्रेक घेतला. त्यानंतर इमरान कोणत्याच सिनेमात दिसला नाही. पण, बॉलिवूडमधून ब्रेक घेतल्यानंतर मात्र इमरानचं आयुष्य पूर्णपणे बदललं होतं.
इमरानने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बॉलिवूडमधील करियर आणि ब्रेक घेण्यावर भाष्य केलं. 'वोग'ला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, "बॉलिवूडमधून ब्रेक घेतल्यानंतर माझं आयुष्य बदललं. मी आधी पाली हिलमधील बंगल्यात राहायचो. पण, आता मी वांद्रेमधील एका फ्लॅटमध्ये राहतो. माझ्या घरात फक्त ३ प्लेट, २ कॉफी मग आणि किचनमध्ये एक फ्राइंग पॅन आहे. मी माझी फरारी विकून फोक्सवेगन घेतली आहे. एक काळ असा होता जेव्हा मी प्रत्येक मेसेजला रिप्लाय द्यायचो. पण, आता असे अनेक कॉल्स, मेसेज आणि ईमेल्स मी पाहतही नाही."
"यश न मिळाल्याने मी अभिनय सोडल्याचं अनेकांना वाटलं. पण, मी नुकताच वडील झालो होतो. त्यामुळे मी ब्रेक घेतला होता. मला माझी मुलगी इमारासाठी बेस्ट वडील व्हायचं होतं," असंही पुढे इमरान म्हणाला. इमराने २०११ साली अवंतिका मलिक हिच्याशी विवाह केला होता. २०१४ मध्ये अवंतिकाने त्यांच्या पहिल्या मुलीला जन्म दिला. पण, ८ वर्षांच्या सुखी संसारानंतर २०१९मध्ये ते वेगळे झाले.