"सिनेमातून क्रूरता दाखवली, मग देशात जे वाईट झालंय ते सगळं दाखवा", 'छावा'बद्दल इम्तियाज जलील यांचं मोठं वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 16:38 IST2025-03-21T16:38:24+5:302025-03-21T16:38:56+5:30
"मी छावा पाहिला नाही, पण सिनेमा बनवायचाच होता तर...", इम्तियाज जलील यांचं मोठं वक्तव्य

"सिनेमातून क्रूरता दाखवली, मग देशात जे वाईट झालंय ते सगळं दाखवा", 'छावा'बद्दल इम्तियाज जलील यांचं मोठं वक्तव्य
छत्रपती संभाजी महाराजांवरचा छावा सिनेमा संपूर्ण जगभरात गाजत आहे. या सिनेमात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर अक्षय खन्ना औरंगजेबाच्या भूमिकेत आहे. औरंगजेबाने क्रूरतेच्या सर्व सीमा पार करत संभाजी महाराजांचा छळ केल्याचं आणि त्यांच्या बलिदानाचा ज्वलंत इतिहास या सिनेमातून दाखवण्यात आला. त्यानंतर छ.संभाजीनगरमधील औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी काही हिंदू संघटना आक्रमक झाल्या. 'छावा' सिनेमामुळे प्रेक्षकांच्या भावना उफाळून आल्याचं म्हटलं जात होतं. यावर इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
इम्तियाज जलील यांनी 'एबीपी माझा'च्या 'माझा व्हिजन'मध्ये हजेरी लावली होती. यावेळी ते म्हणाले, "सिनेमा बनवायचाच होता तर दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे किंवा थ्री इडियटसारखा बनवायचा होता. ज्यामध्ये ३ तासाचं मनोरंजन असेल. सिनेमातून तुम्ही कशी क्रूरता केली हे दाखवलं. मी सिनेमा पाहिलेला नाही. पण, महाराष्ट्र विधानसभेत जे शेतकरी, लाडकी बहीण योजनेचे मुद्दे होते ते सोडून सगळे आमदार, मंत्री सिनेमा बघायला गेले. हा सिनेमा तुम्हाला राजकीय फायदा देतो म्हणून तुम्ही सगळ्यांना घेऊन तो बघायला गेलात. मला एक प्रश्न विचारायचा आहे. लोकांना वाईट वाटेल पण, २०१४ मध्ये बीबीसीने गुजरातवर एक डॉक्युमेंट्री तयार केली होती. तो सिनेमा मग का बॅन केला? आणि छावासाठी तुम्ही सगळ्यांना घेऊन गेलात. देशात जे वाईट झालंय ते सगळं दाखवा आणि लोकांना बघण्याचा अधिकार द्या".
"छावा हा एक प्रपोगंडा सिनेमा आहे, असं तुम्हाला वाटतं का?" यावर ते म्हणाले, "सिनेमा बघितल्यानंतर ज्या लोकांच्या रिअॅक्शन येत आहेत. ते पाहून असं वाटतं की दुख इस बात का नही की धर्म का धंदा चल रहा है, दुख इस बात का है इस धर्म के धंदे मे पढा लिखा भी अंधा हो रहा है. जे शिकलेले लोक आहेत. त्यांनाही असं वाटतं की ४०० वर्षांपूर्वी औरंगजेबाने जे केलं त्याला इम्तियाज जलीलकडे हिशोब मागू."