या आठवड्यातही नऊ चित्रपटांची गर्दी, चार हिंदी आणि पाच मराठी चित्रपट येणार रसिकांच्या भेटीला
By संजय घावरे | Published: March 7, 2024 07:03 PM2024-03-07T19:03:56+5:302024-03-07T19:04:23+5:30
Cinema News: मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच बॉक्स ऑफिसवर सिनेमांची जत्रा भरू लागली आहे. मागच्या शुक्रवारी १३ चित्रपट रिलीज झाल्यानंतर या आठवड्यात नऊ सिनेमे रसिकांच्या भेटीला येणार आहेत. यात चार हिंदी, तर पाच मराठी चित्रपटांचा समावेश आहे.
मुंबई - मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच बॉक्स ऑफिसवर सिनेमांची जत्रा भरू लागली आहे. मागच्या शुक्रवारी १३ चित्रपट रिलीज झाल्यानंतर या आठवड्यात नऊ सिनेमे रसिकांच्या भेटीला येणार आहेत. यात चार हिंदी, तर पाच मराठी चित्रपटांचा समावेश आहे.
मागच्या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये आमिर खान प्रोडक्शनच्या 'लापता लेडीज'ने बाजी मारली आहे. ६.०४ कोटी रुपये बजेट असलेल्या या चित्रपटाने पाच दिवसांमध्ये ४.९५ कोटी रुपयांचा बिझनेस केला. त्यापूर्वी आलेल्या 'आर्टिकल ३७०'ची १०० कोटींच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. त्यामुळे मागच्या आठवड्यात रिलीज झालेल्या इतर चित्रपटांची अवस्था बिकट झाली आहे. अशा परिस्थितीत आणखी नऊ नवीन चित्रपट येणार आहेत. यात उत्कंठावर्धक 'शैतान', 'तेरा क्या होगा लव्हली', 'डबल इस्मार्ट', 'गौरैया लाइव्ह' या चार हिंदी चित्रपटांसोबत 'कन्नी', 'लॉकडाऊन लग्न', 'आमल्ताश', 'तेरव', 'भागीरथी मिसिंग' हे पाच मराठी चित्रपट येणार आहेत.
हिंदी चित्रपटांमध्ये विकास बहल दिग्दर्शित आणि आर. माधवन 'शैतान'ची जोरदार हवा आहे. याचा ट्रेलर लक्षवेधी आहे. यात अजय देवगण आणि ज्योतिका यांच्याही भूमिका आहेत. इतर तीन चित्रपटांपैकी 'तेरा क्या होगा लव्हली'मध्ये रणदीप हुड्डाच्या जोडीला इलियाना डिक्रूझ आहे. अगोदर या चित्रपटाचे शीर्षक 'अनफेअर अँड लव्हली' असे होते. हिंदी, कन्नड, तेलुगू, तमिळ आणि मल्याळममध्ये बनलेल्या पुरी जग्न्नाथ यांच्या 'डबल इस्मार्ट'मध्ये संजय दत्त मुख्य भूमिकेत आहे. गॅब्रियल वत्स दिग्दर्शित 'गौरैया लाइव्ह'मध्ये 'पीपली लाइव्ह' फेम ओमकार दास माणिकपुरी आहे.
समीर जोशी दिग्दर्शित 'कन्नी'मध्ये लंडनच्या पार्श्वभूमीवरील मैत्री आणि प्रेमाची गोष्ट आहे. यात हृता दुर्गुळे, शुभंकर तावडे, अजिंक्य राऊत, वल्लरी विराज, ऋषी मनोहर आहेत. शास्त्रीय गायक राहुल देशपांडे अभिनीत 'आमल्ताश' हा सुहास देसले दिग्दर्शित चित्रपट प्रेम, जीवन आणि संगीतावर आधारलेला आहे. यात पल्लवी परांजपे, दीप्ति माटे, तृषा कुंटे, प्रतिभा पाध्ये यांच्याही भूमिका आहेत. सुमित संघमित्रा दिग्दर्शित 'लॉकडाऊन लग्न' या चित्रपटात हार्दिक जोशी आणि प्रीतम कागणे ही जोडी आहे. विदर्भ, मराठवाडा, खान्देशकडील कॉटन सॉईल तंत्रावर आधारलेल्या हरिश इथापे दिग्दर्शित 'तेरव'मध्ये संदीप पाठक, किरण माने, किरण खोजे, नेहा दंडाळे आहेत. सत्य घटनेवरील 'भागीरथी मिसिंग'मध्ये शिल्पा ठाकरे मुख्य भूमिकेत आहे. तिच्या जोडीला सुरेश विश्वकर्मा, अभिषेक अवचट, चंद्रकांत मूळगुंदकर, संदीप कुलकर्णी आणि पूजा पवार आहेत. याचे दिग्दर्शन सचिन वाघ यांनी केले आहे. हे सर्वच चित्रपट वेगवेगळ्या विषयांवर आधारलेले असले तरी एकाच वेळी प्रेक्षक कोणकोणते चित्रपट पाहणार हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो.