शाहरुख खानच्या या गाण्याचा इंडोनेशियाच्या फॅन्सनी बनवला मजेशीर व्हिडिओ, पाहा हा व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 08:00 AM2019-05-16T08:00:00+5:302019-05-16T08:00:03+5:30
शाहरुख खानला बॉलिवूडचा बादशहा मानले जाते. भारतातच नव्हे तर जगभर त्याचे फॅन्स असून इंडोनियामधील त्याच्या फॅन्सने तर त्याच्या प्रसिद्ध गाण्याचा एक व्हिडिओ बनवला आहे.
बॉलिवूडमधील चित्रपटांना केवळ भारतातच नव्हे तर जगभर प्रेक्षक आवडीने पाहातात. अंधाधुन या चित्रपटाला चीन या देशात नुकतीच मिळालेली लोकप्रियता पाहाता बॉलिवूड चित्रपटाचे फॅन्स जगभर आहेत हे आपल्या लगेचच लक्षात येते. पण तुम्हाला माहीत आहे का, इंडोनेशियामध्ये देखील बॉलिवूड चित्रपट मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात आणि या चित्रपटांची तिथे चांगलीच क्रेझ आहे.
शाहरुख खानला बॉलिवूडचा बादशहा मानले जाते. भारतातच नव्हे तर जगभर त्याचे फॅन्स असून इंडोनियामधील त्याच्या फॅन्सने तर त्याच्या प्रसिद्ध गाण्याचा एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी बनवला होता. कुछ कुछ होता है या प्रसिद्ध चित्रपटाच्या टायटल साँगसारखा हुबेहुब हा व्हिडिओ होता. या व्हिडिओत शाहरुख, राणी मुखर्जी आणि काजोलसारखेच नृत्य या कलाकारांनी सादर केले होते. एवढेच नव्हे तर त्यांनी कपडेदेखील या तिघांसारखेच घातले होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता आणि आता 2000 साली प्रदर्शित झालेल्या मोहोब्बते या चित्रपटातील हमको हमी से चुरालो हे गाणे त्यांनी रिक्रिएट केले आहे.
हमको हमी से चुरालो या गाण्यात शाहरुख खान आणि ऐश्वर्या राय बच्चन मधील असलेली केमिस्ट्री या व्हिडिओतील नायक-नायिकेत देखील पाहायला मिळत आहे. या गाण्यातील प्रत्येक दृश्य त्यांनी जसंच्या तसं कॉपी केले आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. त्यांचे या गाण्यातील कॉश्च्युमदेखील शाहरुख आणि ऐश्वर्याने या गाण्यात घातलेल्या कॉश्च्युमप्रमाणेच आहेत.
इंडोनेशियामधील शाहरुखच्या फॅन्सनी बनवलेल्या या व्हिडिओला केवळ आठ तासांत १६ हजार व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडिओ खूपच मजेशीर असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. या व्हिडिओच्या खाली अनेकांनी कमेंट करत हा व्हिडिओ अफलातून असल्याचे सांगितले आहे. हा व्हिडिओ मी आतापर्यंत दोनदा पाहिला असे एकाने कमेंटमध्ये म्हटले आहे तर दुसऱ्याने सगळे काही अगदी परफेक्ट आहे. केवळ क्लासिकल डान्स जमलेला नाही. पण तरीही या प्रयत्नाला दाद देणे गरजेचे आहे असे कमेंटद्वारे सांगितले आहे.