१४ वर्षीय मुलाचा प्रेरणादायी प्रवास 'प्रल्हाद' लघुपटात, १० रुपयांतून उभारली १० हजार कोटींची कंपनी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2022 08:16 PM2022-09-06T20:16:04+5:302022-09-06T20:19:42+5:30

‘प्रल्हाद’ लघुपटात १० रुपयांतून १० हजार कोटींची कंपनी उभी करणाऱ्या १४ वर्षीय मुलाचा प्रेरणादायी प्रवासाचे प्रभावी चित्रण करण्यात आले आहे.

Inspiring journey of a 14-year-old boy in the short film 'Pralhad', a 10 thousand crore company raised from Rs 10 | १४ वर्षीय मुलाचा प्रेरणादायी प्रवास 'प्रल्हाद' लघुपटात, १० रुपयांतून उभारली १० हजार कोटींची कंपनी

१४ वर्षीय मुलाचा प्रेरणादायी प्रवास 'प्रल्हाद' लघुपटात, १० रुपयांतून उभारली १० हजार कोटींची कंपनी

googlenewsNext

जगात काही कथा अशा असतात ज्या वारंवार सांगायला हव्या असतात, कारण त्यांचा उद्देश असतो की त्यातून पिढ्यांमागून पिढ्यांनी प्रेरणा घ्यावी. फिनोलेक्सच्या संस्थापकांच्या आयुष्यातील निर्णायक घटनांचा मागोवा घेणारी ‘प्रल्हाद’, ही अशीच एक कथा आहे. व्यवसायात पाय रोवू इच्छिणाऱ्या आणि संकटांचा सामना करणाऱ्या उद्योजकांसाठी ही कथा एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे आहे. जेव्हा मनात अनुकंपा आणि मानवी मूल्यांचे मोल करण्याची क्षमता असते, तेव्हा आगळावेगळा विचार करण्याची वृत्ती आणि निर्णायक विचारसरणीला  वेगळीच धार चढते. या लघुपटात फिनोलेक्स समूह ज्या भक्कम पायावर उभा आहे ती मूल्ये, तसेच भारतातील औद्योगिकरणाच्या सुरवातीच्या काळात प्रत्येक उद्योजकाने मिळविलेले यश, यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. या लघुपटाने प्रेक्षकांची मने तर जिंकली आहेतच, त्या सोबतच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत २२ पुरस्कारांचा सन्मान देखील मिळवला आहे. 

हा काळ १९४५चा आहे, जेव्हा एक १४ वर्षाचा मुलगा, आपल्या वडिलांच्या निधनानंतर आपली अमृतसर इथली नोकरी सोडतो आणि खिशात फक्त १० रुपये घेऊन आपल्या कुटुंबाचे पोट भरण्याच्या कामी लागतो. अमृतसरहून मुंबईला जाताना त्याला खचाखच भरलेल्या रेल्वेगाडीच्या डब्यात जणू भारताचे वैविध्यच दिसून येते. प्रत्येकाच्या मनात आशा असतात, प्रवासासोबातच आपल्या चिंता देखील संपतील, हा विश्वासही असतो. प्रल्हाद प्रमाणेच, प्रत्येक जण काम शोधायला आणि पैसे कमवायला, आणि त्यातून गावाकडे आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करण्याचे स्वप्न घेऊन आलेला असतो. काही आपल्या आजारांवर उपचार करुन घ्यायला जात असतात. आणि काही लोक उगाच निरुद्देश प्रवास करत असतात. 
रेल्वेगाडी मुंबईकडे धावत असते. धुराचे लोट हवेत सोडत असते, मधल्या लहान गावांत खेड्यांत थांबत प्रवास सुरु असतो. हळू हळू प्रल्हाद आपल्या सहप्रवाशांशी बोलायला लागतो. हरवलेला जेवणाचा डबा शोधण्याकरता तो ज्या प्रकारे वेगळा विचार करतो आणि डबा शोधतो, त्याचे आत्मविश्वासपूर्ण हास्य आणि आपल्या लाघवी स्वभावामुळे आसपासच्या माणसांना निर्धास्त करणे या गुणांमुळे तो सर्वांची मने जिंकून घेतो. जेव्हा तो अनेकदा आपल्या शर्टचा खिसा तपासतो आणि त्याच्या लक्षात येते की त्याचे १० रुपये हरवले आहेत, तेव्हा हीच वेगळा विचार करण्याची सवय आणि सहज स्वभाव त्याच्या मदतीला येतात. 
अतिशय संयमी राहून, स्वतःचा मान राखून आणि सन्मानाने, अतिशय उच्च कोटीची मूल्ये आणि अनुकंपा याच्या जोरावर तो कसा ती १० रुपयाची नोट परत मिळवतो, हा या कथेचा गाभा आहे. ही घटना त्या मुलाच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरते आणि तिथून त्याचा भारतीय उत्पादन क्षेत्राच्या शिखरावर जाण्याचा प्रवास सुरु होतो, आणि फिनोलेक्स समूह तयार होतो. आपल्या उत्पादनांत मानवी मूल्यांना सर्वोच्च प्राधान्य देतो. सन्मानाने आणि अनुकंपेने व्यवसाय करून शेतकरी, विक्रेते, पुरवठादार, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबांशी मजबूत आणि घट्ट नाते निर्माण करतो. केवळ एका १० रुपयाची नोट घेऊन सुरु झालेला प्रवास पुढे १० हजार कोटींची (२०१६ च्या बाजार मूल्यानुसार) कंपनी तयार करण्यापर्यंत जातो. प्रल्हाद पी. छाब्रिया  यांच्या मागे एक नम्र वारसा आहे जो त्यांची मुले आणि नातवंडे फिनोलेक्स समूहात आज पुढे घेऊन जात आहेत. 


दिवंगत प्रल्हाद पी छाब्रिया यांच्या ‘There’s No Such Thing as a Self-Made Man’ या आत्मचरित्रातील सत्य घटनांवर आधारित हा लघुपट शबंग मोशन पिक्चर्सने, फिनोलेक्स उद्योग समूहाच्या मदतीने बनविला आहे. या लघुपटात जुना काळ अतिशय सुंदर रीतीने दाखविण्यात आला आहे. प्रल्हाद पी छाब्रिया यांची भूमिका रित्विक सहोर (‘लाखो में एक’ फेम) यांनी साकारली आहे. इतर कलाकार आहेत अबीद शमीन, अन्नपूर्णा सेन आणि चिन्मय दास. या लघुपटाने २२ आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत समीक्षकांच्या पसंतीचे पुरस्कार पटकावले आहेत, यात प्राग आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, लंडन चित्रपट आणि टेलीव्हिजन  महोत्सव, मॉस्को आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यांचा समावेश आहे. आता हा लघुपट हमारा मुव्ही या युट्युब चॅनलवर प्रदर्शित केला जाणार आहे. हमारा मुव्ही हे चॅनल सर्वोत्तम भारतीय स्वतंत्र चित्रपट बघण्याचा एक प्रतिष्ठित मंच आहे. 
या चित्रपटाविषयी बोलताना स्व प्रल्हाद पी छाब्रिया यांचे चिरंजीव प्रकाश पी छाब्रिया म्हणाले, “हा लघुपट आजपासून उद्योग सुरु करू इच्छणाऱ्या भारतातल्या सर्व नवीन उद्योजकांना भारतीय उद्योजकतेचे मर्म समजावून सांगेल. लोकांना समजून घेण्याची क्षमता आणि प्रत्येक गोष्टीची इत्यंभूत जाण हे भारतीय उद्योजकतेचे मर्म हे आहे. या कथेत ही मूल्ये अतिशय रंजकतेने मांडली आहेत.” 
या लघुपटाच्या संकल्पनेविषयी बोलताना या लघुपटाचे निर्माते आणि शबंगचे संस्थापक हर्षिल कारीया म्हणाले, “आम्ही नेहमीच दमदार कथांच्या शोधात असतो. अशा कथा, ज्या लोकांना सांगितली जाणे आवश्यक आहे. मग त्या आम्ही ज्या ब्रांडसोबत काम करतो त्याची कथा असो किंवा एकूणच समाजाविषयी असोत, फिनोलेक्स समूहाचे संस्थापक श्री प्रल्हाद पी छाब्रिया यांच्या आयुष्यातून खूप काही शिकण्यासारखे आहे, प्रेरणा घेण्यासारखे आहे. खरे तर त्यांच्या आयुष्यावर एक संपूर्ण सिनेमाच बनवला गेला पाहिजे. मात्र, ‘प्रल्हाद’ या लघुपटाच्या माध्यमातून आम्ही ही एक घटना जगासमोर आणू शकलो याचा आम्हाला आनंद आहे. त्यांनी उभी केलेली कंपनी भारतीय उद्योजकांसाठी अतिशय प्रेरणादायी आहे आणि त्यातून बरेच काही शिकता येते.” 
१९८१ पासून फिनोलेक्सने देशाच्या कृषीविकासात, तसेच नळाने जलपुरवठा व्यवस्था आणि सार्वजनिक स्वच्छतेसाठी ग्रामीण तसेच शहरी भागातही, अत्यंत उत्तम दर्जाची उपकरणे उपलब्ध करत, महत्वाचे योगदान दिले आहे. पीव्हीसी पाईप्स आणि फिटिंग्ससाठी फिनोलेक्सने ग्राहकांना उत्तम उपकरणे दिली आहेत. उत्तम दर्जाच्या अभियांत्रिकी तंत्रज्ञानावर दिलेला भर आणि सर्व स्तरातील, क्षेत्रातील लोकांशी, प्रल्हाद छाब्रिया यांचा असलेला दांडगा जनसंपर्क यामुळे, भारतीय उद्योगजगतात, फिनोलेक्सने देशातल्या अग्रगण्य कंपन्यांच्या पंक्तीत येण्याचा सन्मान मिळवला आहे. आज देशभरात फिनोलेक्सचे, ९०० डिलर्स आणि २१००० किरकोळ विक्रेते आहेत. या कंपनीचे संस्थापक प्रल्हाद छाब्रिया यांनी उभे केलेले हे कुटुंब आजही तेवढेच भक्कम असून आमच्या उत्पादनांवर डोळे झाकून विश्वास ठेवणाऱ्या सर्व ग्राहकांची अखंड सेवा करत आहे. कंपनीची मूल्यसाखळी अधिक समृद्ध करण्यासाठी तसेच कंपनीचे तंत्रज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी कंपनीकडून  सातत्याने गुंतवणूक केली जात आहे. ह्यामुळेच, भविष्यातही बाजारपेठेत आपला दबदबा निर्माण करण्यात आणि भारतीय अर्थव्यवस्थेत आपले मोलाचे योगदान देण्यासाठी फिनोलेक्स सज्ज आहे. 
प्रल्हाद छाब्रिया, त्यांच्या काळातले, अत्यंत नावाजलेले समाजसेवक होते. त्यांनी मुकुल माधव फाऊंडेशन आणि होप फाऊंडेशन अँड रिसर्च सेंटरची स्थापना केली. आजही ही संस्था, दुर्बल, वंचित घटकांसाठी वैद्यकीय सहाय्य, शिक्षण आणि समाजिक कल्याणाचे कार्य करत आहे. तसेच, रत्नागिरी इथे त्यांनी मुकुल माधव विद्यालयाची आणि अभियांत्रिकी संस्थेची देखील स्थापना केली आहे. त्याशिवाय, पुण्यात हिंजेवाडी इथे, आंतरराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान संस्थेचीही स्थापना केली आहे. ते नेहमी म्हणत असत, “मला कधीही औपचारिक शिक्षण घेण्याची संधी मिळाली नाही. मात्र, आता मी अनेक लायक आणि वंचित विद्यार्थ्यांना शिक्षण घेत येईल, अशी सोय केली आहे.माझ्यासारखा अशिक्षित माणूस, या सगळ्यांना शिक्षणाची भेट देऊ शकतो आहे, याचे मला अतिशय समाधान आहे. मी समाजात देत असलेले योगदान, या नव्या पिढीसाठी आणि देशासाठीही कायम स्वरूपात राहणार आहे.”

Web Title: Inspiring journey of a 14-year-old boy in the short film 'Pralhad', a 10 thousand crore company raised from Rs 10

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.