'पत्थर के फूल'च्या शूटींगवेळी बेशुद्ध झाली होती रवीना, सलमानसोबत पहिल्या भेटीचा सांगितला किस्सा...
By अमित इंगोले | Published: October 27, 2020 01:15 PM2020-10-27T13:15:14+5:302020-10-27T13:27:44+5:30
सलमान खान हा तिचा पहिला हिरो होता. पत्थर के फूलपासून सुरू झालेली दोघांची मैत्रीही कायम आहे. त्यानंतर दोघे 'अंदाज अपना अपना' आणि 'कही प्यार न हो जाए'या सिनेमातही एकत्र होते.
बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनने २६ ऑक्टोबरला तिचा ४६वा वाढदिवस साजरा केला. रवीनाने १९९१ मध्ये 'पत्थर के फूल' सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केलं होतं. सलमान खान हा तिचा पहिला हिरो होता. पत्थर के फूलपासून सुरू झालेली दोघांची मैत्रीही कायम आहे. त्यानंतर दोघे 'अंदाज अपना अपना' आणि 'कही प्यार न हो जाए'या सिनेमातही एकत्र होते. 'पत्थर के फूल'च्या शूटींग वेळचा एक किस्सा रवीनाने दैनिक भास्करसोबत शेअर केला.
रवीनाने सांगितले की, 'सिनेमातील 'कभी तू छलिया लगता है...' गाण्यात मला स्केटींग करायचं होतं. पण मला स्केटींग येत नव्हतं. प्रत्येक शॉटमध्ये मी जास्तीत जास्त वेळा खाली पडत होते. एकदा मुंबईत नरिमन पॉइंटवर शेटींग करत होते. बरीच गर्दी जमली होती. मला फारच लाजिरवाणं वाटत होतं. इथे एका शॉटवेळी मी इतकी जोरदार आपटले की, डोक्याला मार लागल्याने मी बेशुद्ध पडले. सगळेच चिंतेत होते. जेव्हा मी डोळे उघडले तर सलमान माझं नाव घेत होता आणि माझ्या तोंडावर पाणी मारत होता. मला फारच वाईट वाटत होतं, मी रडायला लागले होते. सलमान लहान मुलांना समजावतात तसं समजवत होता. मग मी हसायला लागले होते'. (Bday Special : अक्षय कुमारसोबत रवीनाने गुपचूप केला होता साखरपुडा, पण 'या' चुकीमुळे तुटलं दोघांचं नातं...)
सलमानसोबतची पहिली भेट
रवीनाने सलमान खानसोबतच्या पहिल्या भेटीचा किस्साही सांगितला. ती म्हणाली की, एक दिवस ते वांद्रेमध्ये शूटींग करत होते. तेव्हाच तिचा मित्र बंटीचा फोन आला. तो सलमान खानचाही मित्र होता. बंटीने रवीनाला विचारले की, जवळपास असशील तर येऊन भेट. ('KGF: Chapter 2' मध्ये अशी दिसेल रवीना टंडन, बर्थडेला रिलीज केला दमदार लूक...)
जेव्हा ती बंटीला भेटण्यासाठी गेली तर तेव्हा तिथे सलमान खानही होता. सलमान तेव्हा त्याच्या 'पत्थर के फूल' सिनेमासाठी नवीन चेहरा शोधत होता. रवीनाच्या मित्राने सलमानला तिला बघण्याचा सल्ला दिला होता.
तिने सांगितले की, 'मी सिनेमासाठी लगेच होकार दिला. हे ऐकून माझ्या मैत्रीणी फारच आनंदी झाल्या होत्या. त्या म्हणत होत्या की, यानंतर तुला सिनेमा करायचा नसेल तर नाही म्हण, पण हा सिनेमा कर. पण त्यानंतर एकापाठी एक सिनेमे मिळत गेले आणि मी मागे वळून पाहिले नाही'.