Interview : क्राइम थ्रिलर चित्रपट प्रेक्षकांना आवडतात : विजय वर्मा !
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2017 08:14 AM2017-12-10T08:14:49+5:302017-12-10T13:44:49+5:30
-रवींद्र मोरे पिंक, चटगांव, रंगरेज आदी चित्रपटात आपल्या अभिनयाचे कौशल्य दाखविणारा अभिनेता विजय वर्माच्या मुख्य भूमिकेचा ‘मानसून शूटआउट’ हा ...
पिंक, चटगांव, रंगरेज आदी चित्रपटात आपल्या अभिनयाचे कौशल्य दाखविणारा अभिनेता विजय वर्माच्या मुख्य भूमिकेचा ‘मानसून शूटआउट’ हा चित्रपट १५ डिसेंबर रोजी रिलीज होत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाची शूटिंग चार वर्षापुर्वीच पूर्ण झाली होती. तसेच नवाजुद्दीन सिद्दीकीदेखील या चित्रपटात निगेटिव्ह रोल मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी विजयशी मारलेल्या दिलखुलास गप्पा...
* हा चित्रपट रिलीज व्हायला एवढी चार वर्ष का लागली?
- याचे ठोस कारण मला सांगता येणार नाही, दिग्दर्शक आणि निर्मातेच याचे कारण सांगू शकतील. रिलीजला उशिर होण्यामागे फारसे तसे मोठे कारण नाही, असे मी सांगू शकतो. मात्र या चित्रपटाचा प्रीमियर २०१३ मध्ये कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये झालेला आहे. शिवाय बऱ्याच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘सर्वश्रेष्ठ थ्रिलर फिल्म’चे पुरस्कारदेखील मिळाले आहेत.
* या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नवाजुद्दीन सिद्दीकी सहयोग देणार नाहीत, असे कळाले आहे. हे खरे आहे का?
- हो, हे खरे आहे. चार वर्षापूर्वीची गोष्ट वेगळी होती. नवाजुद्दीन आता खूप मोठा स्टार झाला आहे, आणि त्यामुळेच तो आता खूप व्यस्त आहे. त्याच्याजवळ आता वेळ नाहीय. प्रमोशनसाठी विचारले असता, ‘मी खूप व्यस्त असून, माझ्याजवळ वेळ नाहीय..’ असे सांगण्यात आले. आम्ही मात्र चित्रपटाच्या प्रमोशनची जय्यत तयारी केली आहे.
* या चित्रपटातील तुझ्या भूमिकेबाबत काय सांगशिल?
- मी या चित्रपटात एका सब इंस्पेक्टरची भूमिका साकारतोय, जो अकॅडमीतून प्रशिक्षण घेऊन नुकताच क्राइम ब्रांच जॉइन करतो. या ब्रांचमधील एका सिनीयर एन्काउंटर स्पेशालिस्टच्या सोबत मला काम करताना दाखविण्यात आले आहे. माझ्या हातातही बंदुक आहे, मात्र गुन्हेगारांना गोळी मारायची की नाही, याचा अधिकार नाहीय. शिवाय गोळी जरी मारायची आहे, तर समोरचा त्या पातळीचा गुन्हेगार आहे की नाही, हा निर्णयही मला सेकंदापेक्षाही कमी वेळेत घ्यायचा आहे. यावेळी होणारी द्विधा मनस्थिती माझी या चित्रपटात दाखविण्यात आली आहे.
* या चित्रपटाची अभिनेत्री तनिष्ठा चटर्जीसोबतची केमिस्ट्री कशी वाटली?
- तनिष्ठा एक आंतरराष्ट्रीय अभिनेत्री असून तिला बरेच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. तिच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूपच चांगला होता. तिच्या अभिनयाद्वारा मलाही बरेच काही शिकायला मिळाले.
* नवाजुद्दीन सिद्दीकीसोबतच्या अनुभवाबद्दल काय सांगशिल?
- मी नवाजुद्दीनचा सुरुवातीपासून फॅन आहे, आणि भविष्यातही असणार आहे. नवाजुद्दीन खूपच हुशार अभिनेता असून त्याच्या सोबत काम करण्याचा अनुभव म्हणजे मी माझे भाग्यच समजतो. शूटिंगदरम्यान आम्ही दोघेही एकत्र बऱ्याचदा पावसात भिजलो आहोत. यादरम्यान तो त्याचा जीवनप्रवास, संघर्ष याबाबत सांगत असे. यावरुन ‘डाऊन टू अर्थ’ अभिनेता म्हणून त्याची ओळख करणे चुकीचे ठरणार नाही. एवढा मोठा अभिनेता असूनही कोणताच मिजास नसून अतिशय साधे वागणे आहे.
* हा चित्रपट लोकांनी का पाहावा, असे तुला वाटते?
- ज्यांना क्राइम, गॅँगस्टर, पोलिस, मुंबईतील पाऊस आदी गोष्टी आवडतात, ते हा चित्रपट नक्की पाहतील. शिवाय या चित्रपटात जो क्राइम थ्रिलर दाखविण्यात आला आहे, मला नाही वाटत की यासारखा अन्य चित्रपटात दाखविण्यात आला असेल. हा क्राइम थ्रिलर वेगळ्याच स्वरुपाचा असून तो नक्कीच लोकांना आवडेल.