"मी तुम्हाला वचन देतो की...", बाबिलला येतेय इरफान खानची आठवण, वडिलांसाठी भावुक पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2024 10:57 AM2024-04-28T10:57:19+5:302024-04-28T10:58:50+5:30
"मी कधीही हार मानणार नाही", इरफान खानच्या आठवणीत लेक बाबिल भावुक
बॉलिवूड अभिनेता इरफान खान आज आपल्यात नसला तरी प्रेक्षकांच्या मनातील त्याचं स्थान आजही कायम आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत इरफानचा लेक बाबिल खानही अभिनयात करिअर करत आहे. बाबिल सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. गेल्या काही दिवसांपासून बाबिलला वडील इरफान खानची आठवण येत आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने क्रिप्टिक पोस्ट शेअर केली होती. "कधी कधी वाटतं की हार मानून वडिलांकडे जावं", असं बाबिलने पोस्टमध्ये म्हटलं होतं. त्याच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यानंतर आता बाबिलने पुन्हा इरफानसाठी पोस्ट लिहिली आहे.
बाबिलने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन इरफानचे काही फोटो शेअर केले आहेत. "तुम्ही मला योद्धा बनायला शिकवलं. पण, त्याबरोबरच प्रेम आणि दयाळूपणाही शिकवला. तुम्ही मला उमेद ठेवायला आणि त्याबरोबरच लोकांसाठी लढायला शिकवलं. तुमचे चाहते नव्हते तर ते कुटुंब होतं. मी तुम्हाला वचन देतो की आपल्या माणसांसाठी आणि कुटुंबासाठी मी लढेन. मी कधीच हार मानणार नाही. मी तुमच्यावर खूप प्रेम करतो", असं म्हणत बाबिलने भावुक पोस्ट शेअर केली आहे.
कोणताही गॉडफादर नसताना केवळ टॅलेंटच्या जोरावर अभिनेता इरफान खानने बॉलिवूडमध्ये नाव कमावलं. केवळ बॉलिवूडच नाही तर त्याने हॉलिवूडमध्येही अभिनयाचा डंका वाजवला. चार वर्षांपूर्वी इरफान खानने या दुनियेला अलविदा म्हटलं. त्याने अचानक घेतलेल्या एक्झिटने चाहत्यांना धक्का बसला होता. कॅन्सरने इरफानचं २९ एप्रिल २०२० रोजी निधन झालं.