अफवांवर विश्वास ठेवू नका...! इरफान खानच्या प्रवक्त्याने केली विनंती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 10:09 AM2020-04-29T10:09:02+5:302020-04-29T10:09:50+5:30
इरफान लवकर बरा व्हावा, यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.
बॉलिवूड अभिनेता इरफान खानची तब्येत अचानक तब्येत बिघडल्यामुळे त्याला कोकिलाबेन रुग्णालयात आयसीयूमध्ये भरती करण्यात आले आहे. इरफान लवकर बरा व्हावा, यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. अशात इरफानच्या प्रकृतीबद्दल अनेक अफवा पसरल्या आहेत. आता इरफानच्या प्रवक्त्याने कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
इरफानच्या प्रकृतीबद्दल वेगवेगळे तर्क काढले जात आहे. प्रत्यक्षात हे सगळे निराशाजनक आाहे. चाहते चिंतीत आहेत, याची कल्पना आहे. पण काही लोक अफवा पसरवून चिंतेत भर घालत आहेत, हे दुर्दैवी आहे. इरफान एक खंबीर व्यक्तिमत्त्व आहे आणि खंबीरपणे आजाराशी लढतोय. कृपया कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. काल्पनिक गोष्टींमध्ये तथ्य शोधू नका. याआधीही आम्ही इरफानच्या प्रकृतीबद्दल वेळोवेळी माहिती दिली आहे. आम्ही अधिकृतपणे ही माहिती पुरवत राहू, असे इरफानच्या प्रवक्त्याने जारी केलेल्या स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वा इरफानची आई सईदा बेगम यांचे जयपूरमध्ये निधन झाले होते. मात्र लॉकडाऊन असल्यामुळे इरफानला जयपूरमध्ये पोहोचू शकला नव्हता. त्यानंतर काल इरफानची तब्येत बिघडली आणि त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले. दोन वर्षांपूर्वी 2018 मध्ये इरफानने त्याच्या आजाराबद्दल आपल्या फॅन्सना सांगितले होते. इरफानला न्यूरो इंडोक्राइन ट्यूमर हा आजार आहे.
दरम्यान नेहमी रुटीन चेकअपसाठी इरफान कोकिलाबेन रुग्णालयात जातो. आताही त्याला तिथेच भरती करण्यात आले आहे. इरफान त्याची पत्नी सुतापासोबत मुंबईतच राहतो. त्यांना बाबिल आणि अयान अशी दोन मुलं देखील आहेत. हे सर्वजण आता त्याच्याबरोबर रुग्णालयात असल्याची माहिती मिळते आहे.
इरफानच्या आजारावर लंडनमध्ये उपचार सुरु होते. दीर्घकाळ उपचार घेतल्यानंतर सप्टेंबर 2019 मध्ये इरफान भारतात परतला होता. यानंतर त्याने ‘अंग्रेजी मीडियम’ या सिनेमाचे शूटींग सुुरू केले होते. नुकताच हा सिनेमा रिलीज झाला होता.