अभिनेता इरफानची 'ती' शेवटची इच्छा अर्धवटच राहिली; पत्नी सुतापावर करायचा प्रचंड प्रेम, पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 01:18 PM2021-05-18T13:18:44+5:302021-05-18T13:28:24+5:30
आपल्या एका मुलाखतीत इरफानने सांगितले होते की त्यांच्या उपचारादरम्यान पत्नी सुतापाने नेहमीच त्याची काळजी घेतली.
बॉलिवूड अभिनेता इरफान खान आज या जगात नाही पण त्याच्या आठवणी चाहत्यांच्या हृदयात ताज्या आहेत. कर्करोगाच्या उपचारातून परत आल्यानंतर त्याने आपल्या पत्नीसाठी बर्याच भावनिक गोष्टी शेअर केल्या. इरफान इंग्लिश मीडियम या चित्रपटाच्या शूटिंगसाठी परत आला. मात्र चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर तो पुन्हा आजारी पडला. यादरम्यान, 'मी जिवंत आहे तर त्याच मुख्य कारण माझी पत्नी आहे'
इरफानचे पत्नीवर होते प्रचंड प्रेम
आपल्या एका मुलाखतीत इरफानने सांगितले होते की त्यांच्या उपचारादरम्यान पत्नी सुतापाने नेहमीच त्याची काळजी घेतली. शेवटच्या काळात अभिनेत्याची एकच इच्छा होती की त्याला आपल्या पत्नीसाठी जगायचे होते. एका मुलाखतीदरम्यान पत्नी सुतापाबद्दलही तो भरभरून बोलला होता. सुतापाबद्दल काय सांगू. आठवड्याचे सातही दिवस 24 तास ती माझ्यासोबत होती. उपचाराच्या काळात तिने अगदी लहान बाळासारखी माझी काळजी घेतली. आजही घेतेय. मी आज जिवंत आहे, याचे कारण ती आहे. मला जीवदान मिळालेच तर फक्त आणि फक्त तिच्यासाठी जगायला मला आवडेल, असे तो म्हणाला होता. इरफानच्या शेवटच्या दिवसांत पत्नी सुतापा त्याच्या मागे सावलीसारखी उभी राहिली होती. पण इरफानची कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली आणि त्याने गेल्यावर्षी जगाचा निरोप घेतला.
अशी सुरु झाली होती इरफान आणि सुतापाची लव्हस्टोरी
इरफान जयपूरमध्ये एमए करत असताना त्याला अचानक दिल्लीतील प्रसिद्ध नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाची स्कॉलरशिप मिळाली आणि त्याच्या आयुष्याला एक कलाटणी मिळाली. तिथेच त्याची आणि सुतापाची पहिली भेट झाली. सुतापाला अभिनयात नव्हे तर लेखनात रस होता. काहीच भेटींमध्ये इरफान आणि सुतापा एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स बनले आणि या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले.
इरफानने १९९४ मध्ये त्याच्या अभिनयप्रवासाला सुरुवात केल्यानंतर त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी १९९५ मध्ये कोर्टात लग्न केले. सुतापाने इरफानच्या करियरच्या सुरुवातीला त्याच्यासोबत एक टेलिफिल्म बनवली होती... हीच टेलिफिल्म पाहून त्याला गोविंद निहलानी यांनी अभिनयक्षेत्रात संधी दिली. इरफान आणि सुतापाने करियरच्या सुरुवातीला अनेकवेळा एकत्र काम केले. बनेगी अपनी बात या मालिकेची लेखिका सुतापा होती तर या मालिकेत इरफानने महत्त्वाची भूमिका साकारली होती.