इरफान खानच्या कबरीची अवस्था पाहून नाराज झाले होते फॅन्स, आता बदलला चेहरामोहरा...
By अमित इंगोले | Published: October 9, 2020 09:19 AM2020-10-09T09:19:44+5:302020-10-09T10:07:51+5:30
आता इरफान खानच्या कबरीचा चेहरामोहराच बदलला आहे. कबरीवर काम केल्यानंतरचे फोटो त्यांचा मुलगा बाबिलने शेअर केले आहेत.
दिवंगत बॉलिवूड अभिनेते इरफान खान यांचं काही महिन्यांपूर्वी निधन झालं आणि सर्वांनाच धक्का बसला. काही दिवसांपूर्वी इरफान खानचे फॅन्स नाराज होते. कारण त्यांच्या कबरेची स्थिती व्यवस्थित नव्हती. आजूबाजूला गवत उगवलं होतं. याचे काही फोटोही सोशल मीडियात व्हायरल झाले होते. पण आता इरफान खानच्या कबरीचा चेहरामोहराच बदलला आहे. कबरीवर काम केल्यानंतरचे फोटो त्यांचा मुलगा बाबिलने शेअर केले आहेत.
बाबिलने गुरूवारी आपल्या इन्स्टाग्रामवर वडील इरफान खानच्या कबरीचे नवे फोटो शेअर केले आहेत. यात कबरीच्या आजूबाजूला स्वच्छता केलेली दिसत आहे आणि कबरीवर फुलंही आहेत. सोबतच बाबिलने रशियातील फिल्ममेकर, थिएटर डायरेक्टर आणि रायटर आन्द्रेइ तार्कोव्हस्कीची ओळ लिहिली, 'जेव्हा एका माणसाचा जन्म होतो तेव्हा तो कमजोर आणि लवचिक असतो. जेव्हा तो मरतो तेव्हा तो कठोर आणि असंवेदनशील होतो. जेव्हा एक झाड वाढत असतं, तेव्हा तो कोमल असतं. पण ते सुकतं आणि कठोर होतं. तेव्हा ते मरतं. कठोरता आणि शक्ती हे त्याचे साथीदार आहेत. प्रसन्नता आणि कमजोरी अस्तित्वाच्या ताजेपणाचा भाव आहेत. कारण जो कठोर झाला आहे तो कधीही जिंकणार नाही'.
काही दिवसांपूर्वी अभिनेते चंदन रॉय सान्याल इरफान खानच्या कबरेवर गेला होता. आणि तेथील फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यावेळी कबरीची स्थिती पाहून इरफान खानचे फॅन्स नाराज झाले होते. सर्वांनी आपल्या आवडत्या कलाकाराची कबर पाहून निराशा व्यक्त केली होती.
५३ वर्षीय अभिनेते इरफान खान यांचं २९ एप्रिलला मुंबईच्या कोकिळाबेन हॉस्पिटलमध्ये निधन झालं होतं. ते एक दिवसांपूर्वी कोलन इन्फेक्शनमुळे हॉस्पिटलमध्ये भरती झाले होते. गेल्या दोन वर्षांपासून ते कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी लढत होते. आणि त्यासाठी परदेशातही उपचार घेत होते. अखेर त्यांचा कॅन्सरसोबतचा लढा संपला.