आजारी असतानाही इरफान करतोय काम, लंडनमध्ये पाहिला 'कारवां'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2018 04:11 PM2018-07-23T16:11:44+5:302018-07-23T16:13:35+5:30
'कारवां' पाहिल्यानंतर इरफान खूप खूश झाला होता. यावेळी त्याच्यासोबत त्याची पत्नी व जवळचे मित्र उपस्थित होते.
अभिनेता इरफान खान एंडोक्राईन ट्यूमर या दुर्धर आजाराने पीडित असून सध्या लंडनमध्ये उपचार घेतो आहे. त्याचा आगामी चित्रपट 'कारवां' प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. नुकतेच त्याच्यासाठी लंडनमध्ये या चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग ठेवण्यात आले होते.
मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार, 'कारवां' पाहिल्यानंतर इरफान खूप खूश झाला होता. यावेळी त्याच्यासोबत त्याची पत्नी व जवळचे मित्र उपस्थित होते. चित्रपटाचे संवाद लेखक हुसैन यांनी सांगितले की, इरफानने चित्रपट पाहिल्यानंतर थोडे बदल सुचवले आहेत. जे खूप छोटे बदल आहेत. कारवां पाहिल्यानंतर इरफानने सकारात्मक प्रतिक्रिया दिली. आम्हाला आशा आहे की इरफान लवकर बरा होऊन भारतात येईल. 'कारवां' चित्रपट त्याला आवडला आमच्यासाठी ही मोठी बाब आहे.'
एका मुलाखती दरम्यान दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी इरफानच्या तब्येतीबद्दल सांगितले होते. ते म्हणाले की,'इरफानच्या प्रकृतीत सुधारणा होते आहे. आम्ही दोघे मॅसेजवर बोलतो. मला आशा आहे की तो लवकरच बरा होऊन भारतात परतेल.'
'कारवां' चित्रपटाची कथा तीन अनोळखी लोकांच्या अवतीभवती फिरणारी आहे. एका अनपेक्षित वळणावर त्यांची ओळख होते. आयुष्याकडे पाहण्याचा या तिघांचाही वेगवेगळा दृष्टिकोन असतो. पण आयुष्यातील काही घटना या तिघांनाही एकत्र आणतात, हे सिनेमात दाखवण्यात आले आहे. हा चित्रपट केरळच्या निसर्गसौंदर्याने नटलेल्या भागात चित्रीत करण्यात आला आहे. या चित्रपटातून मल्याळम अभिनेता दलकीर सलमान बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. दलकीरने 'ओके कनिमनी', 'चार्ली' यांसारख्या बऱ्याच हिट चित्रपटात काम केले आहे. त्याच्यासोबत अभिनेत्री मिथिला पालकर बॉलिवूडमध्ये एन्ट्री करते आहे. मिथिला 'लिटिल थिंग्स' या वेबसीरिजमधून लोकप्रिय झाली आहे. तसेच तिने मराठी चित्रपट 'मुरांबा'मध्ये देखील काम केले आहे. त्यामुळे दोघांसाठीही हा चित्रपट महत्त्वाचा आहे. 'कारवां' चित्रपट ३ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.