"मी प्रियंकाची भूमिका जास्त चांगली केली असती", ईशा कोप्पिकर स्पष्टच बोलली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2024 04:34 PM2024-12-04T16:34:37+5:302024-12-04T16:35:58+5:30
२०११ साली डॉन चा सीक्वेल आला. त्यासाठी मी स्वत: फरहान अख्तरला संपर्क केला होता. मात्र...
अभिनेत्री ईशा कोप्पिकर (Isha Koppikar) बऱ्याच काळापासून सिनेसृष्टीपासून दूर आहे. २००० सालानंतर तिने काही काळ अनेक हिट सिनेमे दिले. नुकताच तिचा 'अयलान' सिनेमा आला. ईशाला म्हणावं तसं यश टिकवता आलं नाही. शिवाय गेल्या वर्षीच तिचा घटस्फोटही झाला. आता नुकतंच ईशाने एका मुलाखतीत शाहरुख खानच्या 'डॉन 2'मध्ये प्रियंका चोप्राची भूमिका मी जास्त चांगली केली असती असा खुलासा केला.
२०06 साली 'डॉन २' सिनेमा रिलीज झाला होता. यामध्ये शाहरुख खानच्या चार्मने लक्ष वेधलं. तसंच प्रियंका चोप्रानेही दमदार अॅक्शन सीन्स देत आपली भूमिका उत्तम पार पाडली. सिनेमात ईशा कोप्पिकरही छोट्या भूमिकेत होती. नुकतंच तिने प्रियंकाची भूमिका आपण जास्त चांगली केली असती असा खुलासा केला. 'गलाटा इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत ईशा म्हणाली, "मला वाटतं प्रियंकाची भूमिका माझ्या भूमिकेच्या तुलनेत जास्त शक्तिशाली होती. मी ती भूमिका करण्यासाठी सगळं पणाला लावलं असतं. मी प्रामाणिकपणे सांगते मी तायक्वांदोमध्ये ब्लॅक बेल्ट आहे. २५ वर्ष मी तायक्वांदो शिकले आहे. मी अतिशय उत्तम अॅक्शन करु शकते. कोणाही हिरोईनला मी टक्कर देऊ शकते. अगदी आताच्या माझ्या वयापेक्षा अर्ध्या वयाच्या मुलींनाही मी टक्कर देऊ शकते. मला माहितीये मी चांगलं करेन. पण ठिके, जे झालं ते झालं."
यासोबतच ईशा असंही म्हणाली की, "२०११ साली डॉन चा सीक्वेल आला. त्यासाठी मी स्वत: फरहान अख्तरला संपर्क केला होता. मात्र त्याने कलाकार आधीच निवडले गेले आहेत असं सांगितलं. ठिके काही हरकत नाही कधी तुम्ही जिंकता तर कधी हरता."
ईशा कोप्पिकरने 'कृष्णा कॉटेज', 'एक विवाह ऐसा भी', 'क्या कूल है हम' सारख्या काही सिनेमांमध्ये काम केलं आहे. दरम्यान काही महिन्यांपूर्वीच ईशाचा पती टिम्मी नारंगसोबत घटस्फोट झाला. आता ती एकटी सात वर्षीय लेकीचा सांभाळ करत आहे.