‘लोकमत’च्या इव्हेंटमध्ये ‘धडक’ जोडीचा जलवा! जान्हवी कपूर व ईशान खट्टर पुण्यात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2018 20:58 IST2018-07-06T20:52:33+5:302018-07-06T20:58:51+5:30
जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर यांचा ‘धडक’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. आपल्या याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जान्हवी व ईशान आज शुक्रवारी ‘लोकमत’ने पुण्यातील सिझन मॉलमध्येआयोजित केलेल्या कार्यक्रमात पोहोचलेत

‘लोकमत’च्या इव्हेंटमध्ये ‘धडक’ जोडीचा जलवा! जान्हवी कपूर व ईशान खट्टर पुण्यात!
जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर यांचा ‘धडक’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. आपल्या याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जान्हवी व ईशान आज शुक्रवारी ‘लोकमत’ने पुण्यातील सिझन मॉलमध्येआयोजित केलेल्या कार्यक्रमात पोहोचलेत. पुण्यात पोहोचल्या पोहोचल्या ‘धडक’ जोडीने सर्वप्रथम पुण्यातील मीडियाला संबोधित केले. तोपर्यंत सिझन मॉलबाहेर चाहत्यांनी एकच गर्दी केली होती. प्रत्येकाला ‘धडक’ गर्ल जान्हवीची एक झलक पाहायची होती.तर हॅण्डसम ईशानचा एक छबी टिपायची होती.
घड्याळाचे काटे पुढे सरकत होते आणि चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. याचदरम्यान जान्हवी आणि ईशानचे मॉलमध्ये आगमन झाले आणि हजारोंच्या संख्येने जमलेल्या गर्दीने एकच गलका केला.
या गर्दीमध्ये कॉलेजच्या तरूण तरूणींची संख्या अधिक होती. यातही तरूणींचा गर्दी लक्षवेधी होती. ईशानला आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी या तरूणींची धडपड सुरु होती.
दरम्यान पत्रपरिषदेत बोलताना ईशानने चाहत्यांच्या प्रचंड प्रतिसादाबद्दल आभार मानले. ‘धडक’च्या प्रमोशनच्या निमित्ताने आणि लखनौ, जयपूर अशा अनेक ठिकाणी गेलोत. प्रत्येक ठिकाणी आम्हाला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. चाहत्यांसोबत असे प्रत्यक्ष भेटताना जाम मज्जा येतेय, असे ईशान म्हणाला. जान्हवीनेही त्याला दुजोरा दिला. आम्हाला चाहत्यांचे जितके प्रेम मिळतेय, तितकेच प्रेम आमच्या ‘धडक’ या चित्रपटालाही मिळावे, अशी अपेक्षा तिने बोलून दाखवली.
नागराज मंजुळे यांच्या गाजलेल्या सैराट या मराठी सिनेमाचा 'धडक' हा हिंदी रिमेक आहे. येत्या 20 जुलैला हा सिनेमा रिलीज करण्यात येणार आहे.