चांद्रयान-2 मोहीम आणि प्रभासचा हा आहे संबंध, त्याने ट्विटरद्वारे मानले आभार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 04:46 PM2019-07-22T16:46:07+5:302019-07-22T17:05:12+5:30
श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतरिक्ष केंद्रातून 'बाहुबली' रॉकेटच्या मदतीने चांद्रयान-2 यानाने यशस्वी उड्डाण केले.
130 कोटी देशवासीयांसह संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या इस्रोच्या चांद्रयान-2 आज दुपारी 2.43 मिनिटांनी चंद्राच्या दिशेने झेपावले. गेल्या रविवारी मध्यरात्री नियोजित असलेले चांद्रयान-2 चे प्रक्षेपण तांत्रिक कारणामुळे स्थगित करण्यात आल्याने इस्रोच्या शास्रज्ञांसह देशवासीयांच्या मनात चिंतेचे वातावरण पसरले होते. मात्र आज हे यान नियोजित कार्यक्रमाप्रमाणे चंद्राच्या दिशेने यशस्वीरीत्या झेपावले.
Launch of Chandrayaan 2 by GSLV MkIII-M1 Vehicle https://t.co/P93BGn4wvT
— ISRO (@isro) July 22, 2019
श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतरिक्ष केंद्रातून 'बाहुबली' रॉकेटच्या मदतीने चांद्रयान-2 यानाने दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी यशस्वी उड्डाण केले. हे उड्डाण पाहण्यासाठी देशभरातून हजारो लोक आले होते. जवळपास 7500 लोकांनी ऑनलाईन बुकिंग केले होते. यासाठी इस्त्रोने 10000 लोक बसू शकतील अशी गॅलरी बनविली होती. दरम्यान, आजच्या यशस्वी उड्डाणानंतर चांद्रयान-2 काही दिवस पृथ्वीच्या कक्षेत भ्रमण करणार असून त्यानंतर ते चंद्राच्या दिशेने रवाना होईल आणि 6 सप्टेंबर रोजी चांद्रयान चंद्रावर उतरेल.
WATCH: L-110 ignites and the S200 rockets separate from the main rocket. #Chandrayaan2#ISROpic.twitter.com/q8D85SPfG2
— ANI (@ANI) July 22, 2019
या रॉकेटचे नाव 'बाहुबली' असल्याचा आनंद प्रभासने ट्वीट करत व्यक्त केला आहे. त्याने ट्वीटमध्ये लिहिले आहे की, आजचा क्षण हा प्रत्येक भारतीयासाठी खास आहे. चांद्रयान-2 आज चंद्राच्या दिशेने झेपावले. बाहुबली या चित्रपटाच्या टीमसाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे की, या रॉकेटला बाहुबली हे नाव देण्यात आलेले आहे.
चांद्रयान 2 ला पृथ्वीच्या कक्षेत पोहोचविण्यासाठी इस्त्रोने शक्तिशाली रॉकेट जियोसिंक्रोनस सॅटेलाईट लाँच व्हेईकल मार्क 3 (जीएसएलव्ही-एमके 3) वापर केला. या रॉकेटला 'बाहुबली' असे नाव दिले आहे. या रॉकेटचे वजन 640 टन असून रॉकेटची किंमत 375 कोटी रुपये आहे. या रॉकेटने 3.8 टन वजनाच्या चांद्रयान-2 या यानाला घेऊन उड्डाण केले. या यानाच्या निर्मितीचा खर्च 6.3 कोटी रुपये आहे. आतपर्यंत केवळ अमेरिका, रशिया आणि चीन या तीन देशांनीच यान चंद्रावर नेले आहे.
#GSLVMkIII-M1 successfully injects #Chandrayaan2 spacecraft into Earth Orbit
Here's the view of #Chandrayaan2 separation#ISROpic.twitter.com/GG3oDIxduG— ISRO (@isro) July 22, 2019
इस्रोच्या या कामगिरीसाठी देशभरातून त्यांचे कौतुक केले जात आहे. सामान्य व्यक्तीच नव्हे तर बॉलिवूड सेलिब्रेटीदेखील ट्विटरद्वारे कौतुकांचा वर्षाव करत आहे.