देव आनंद यांच्या ११० चित्रपटांमधील वस्तूंचा होणार लिलाव; ८ ते १० फेब्रुवारी दरम्यान लागणार लागणार बोली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2024 07:33 PM2024-02-01T19:33:11+5:302024-02-01T19:33:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई - सदाबहार अभिनेते देव आनंद यांच्या अजरामर कलाकृती त्यांच्या पश्चातही रसिकांचे मनोरंजन करीत आहेत. अनोखी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई - सदाबहार अभिनेते देव आनंद यांच्या अजरामर कलाकृती त्यांच्या पश्चातही रसिकांचे मनोरंजन करीत आहेत. अनोखी अभिनय शैली, संवादफेक आणि दिग्दर्शनाद्वारे रसिकांच्या मनावर गारूड करणाऱ्या देव आनंद यांच्या चित्रपटांमधील वस्तू खरेदी करण्याची संधी त्यांच्या चाहत्यांना मिळणार आहे. ८ ते १० फेब्रुवारी दरम्यान या वस्तूंची ऑनलाईन बोली लावता येणार आहे.
मागील वर्षभरात, 'डेरिवाज़ अँड इव्स'ने सत्यजित रे, अमिताभ बच्चन यांच्या बच्चनालिया आणि राज कपूर यांच्या संस्मरणीय संग्रहातील वस्तूंचा लिलाव यशस्वीपणे केला होता. या वर्षाच्या सुरुवातीलाच देव आनंद यांच्या चित्रपटांमधील त्यांच्या वस्तूंचा ऑनलाईन लिलाव करण्यात येणार आहे. ८ फेब्रुवारीला डेरिवाज़ डॅश इव्स या संकेतस्थळावर देव आनंद यांच्या वस्तूंचा लिलाव सुरू होणार आहे. हा लिलाव १० फेब्रुवारी संध्याकाळी ७ वाजता बंद होईल. यात बाजी, काला बाजार, सी.आई.डी., काला पानी, गाइड, तेरे घर के सामने, हरे रामा हरे कृष्णा, जॉनी मेरा नाम, हीरा पन्ना सारख्या क्लासिक्स चित्रपटांमधील दुर्मिळ आणि जुने फोटो, पोस्टर्स, शोकार्ड, लॉबी कार्ड आदींचा समावेश करण्यात येणार आहे. यात त्यांच्या बहुचर्चित चित्रपटांपैकी आराम, मिलाप, माया, मंजिल, कहीं और चल, बारिश, बात एक रात की, सरहद, किनारे किनारे आदि चित्रपटांच्या गाण्यांच्या पुस्तकांचाही समावेश असेल.