'या' प्रसिद्ध अभिनेत्याने एकेकाळी थिएटरबाहेर विकले होते शेंगदाणे; आज आहे 212 कोटींचा मालक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 10:08 AM2023-09-29T10:08:32+5:302023-09-29T10:09:18+5:30
Bollywood actor: या अभिनेत्याचा मुलगादेखील प्रसिद्ध अभिनेता आहे.
'हिरो' या गाजलेल्या सिनेमातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात करणारा अभिनेता म्हणजे जॅकी श्रॉफ (Jackie Shroff). आज कलाविश्वात जॅकी यांचं नाव आदराने घेतलं जातं. त्यांचा प्रत्येक सिनेमा त्या काळी बॉक्स ऑफिसवर गाजला. उत्तम अभिनय आणि स्वभावातील साधेपणा यामुळे जॅकी श्रॉफ यांनी कायमच प्रेक्षकांची मनं जिंकली. आज त्यांच्याकडे यश, संपत्ती, पैसा, प्रसिद्धी सारं काही आहे. परंतु, एक काळ असा होता जेव्हा ते चक्क थिएटरबाहेर शेंगदाणे विकून उदरनिर्वाह करायचे.
जॅकी श्रॉफ कलाविश्वात येण्यापूर्वी किरकोळ कामे करुन उदरनिर्वाह करत होते. सुरुवातीला त्यांनी एका ट्रॅव्हल एजन्सीमध्ये काम केलं. हे काम करत असतानाच त्यांना मॉडलिंगची ऑफर मिळाली. जॅकी श्रॉफ एकदा बसस्टॉपवर उभे होते. त्यावेळी एका अॅड एजन्सीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीची त्यांच्यावर नजर पडली आणि त्याने जॅकीला मॉडलिंगची ऑफर दिली. या व्यक्तीला भेटल्यानंतर जॅकी श्रॉफचं नशीब पालटलं आणि त्यांचा कलाविश्वातील प्रवास सुरु झाला.
लहानपणापासून अभिनेत्याने केला संघर्ष
जॅक श्रॉफ यांचे वडील एक ज्योतिष होते. परंतु, त्यांच्या कमाईमध्ये घरखर्च चालवणं तसं कठीण होतं. जॅकी श्रॉफ १० वर्षांचे असतांना त्यांच्या मोठ्या भावाला नोकरी मिळाली. हा भाऊ त्यांच्यापेक्षा ७ वर्षांनी मोठा होता. वडिलांसोबत तोही घरखर्च चालवण्यास मदत करु लागला. परंतु, त्यांच्या भावाचा समुद्राच्या पाण्यात वाहून मृत्यु झाला. भावाच्या निधनानंतर पुन्हा सगळ्या घराचा भार वडिलांच्या खांद्यावर आला. जॅकी १० वीमध्ये असताना त्यांना शाळेची फी भरायलाही पैसे नव्हते. अखेर जॅकी यांनी कसंबसं करुन ११ वी पर्यंत शिक्षण घेतलं आणि त्यानंतर त्यांनी शिक्षण सोडून दिलं.
शिक्षण सोडल्यानंतर घर चालवण्यासाठी त्यांनी सुरुवातीला आईसोबत घरोघरी जाऊन साड्या, भांडी विकली. त्यानंतर त्यांनी भिंतींवर पोस्टर्सही चिटकवले. इतकंच नाही तर त्यांनी थिएटर बाहेर शेंगदाणेदेखील विकले. असा बराच स्ट्रगल केल्यानंतर त्यांना एका ट्रॅव्हल एजन्सीमध्ये नोकरी मिळाली.
मॉडलिंगमुळे बदललं नशीब
ट्रॅव्हल एजन्सीमध्ये काम करत असतानाच त्यांना बस स्टॉपवर एका व्यक्तीने मॉडलिंगची ऑफर दिली. त्यावेळी त्यांना या फोटोशूटसाठी तब्बल ७ हजार रुपये मिळाले होते. त्यांना हे काम इतकं आवडलं की त्यांनी ट्रॅव्हल एजन्सी सोडून मॉडलिंग करण्यास सुरुवात केली.
दरम्यान, मॉडलिंग करत असतानाच त्यांना सिनेमाच्या ऑफर्सही मिळू लागल्या. स्वामी दादा या सिनेमा त्यांनी लहानशी भूमिका केली होती. त्यानंतर त्यांना हिरो हा पहिला सिनेमा मिळाला. यात त्यांनी मुख्य भूमिका केली होती. आज ते २१२ कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत.