अभिनेता बनल्यावरही या अभिनेत्याला वापरायला लागायचे चाळीतील टॉयलेट... आज आहे सुपरस्टार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2020 09:49 IST2020-01-12T09:43:25+5:302020-01-12T09:49:02+5:30
या अभिनेत्याने आजवर अनेक हिट चित्रपट दिले आहेत.

अभिनेता बनल्यावरही या अभिनेत्याला वापरायला लागायचे चाळीतील टॉयलेट... आज आहे सुपरस्टार
ठळक मुद्देजॅकीने बॉलिवूडमध्ये येण्याआधी प्रचंड स्ट्रगल केला आहे. तो अतिशय गरीब कुटुंबातील असून तो मुंबईत अनेक वर्षं एका चाळीतील छोट्याशा खोलीत राहायचा.
द कपिल शर्मा शो हा प्रेक्षकांचा प्रचंड आवडता कार्यक्रम असून बॉलिवूडमधील मंडळी आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी या कार्यक्रमाला पहिली पसंती देतात. या कार्यक्रमात आजवर बॉलिवूडमधील अनेक कलाकार, गायक, दिग्दर्शक, निर्माते तसेच खेळ जगतातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली आहे. या आठवड्यात द कपिल शर्मा शोमध्ये प्रसिद्ध अभिनेता जॅकी श्रॉफ हजेरी लावणार आहे.
जॅकी श्रॉफ या कार्यक्रमात कपिल शर्मा आणि त्याच्या टीमसोबत प्रचंड मजा-मस्ती करणार आहे. त्याचसोबत त्याच्या आयुष्यातील इंटरेस्टिंग किस्से देखील सांगणार आहे. एवढेच नव्हे तर जॅकी श्रॉफ त्याच्या शालेय जीवनातील गर्लफ्रेंडविषयी देखील या कार्यक्रमात बोलताना दिसणार आहे.
जॅकीने बॉलिवूडमध्ये येण्याआधी प्रचंड स्ट्रगल केला आहे. तो अतिशय गरीब कुटुंबातील असून तो मुंबईत अनेक वर्षं एका चाळीतील छोट्याशा खोलीत राहायचा. त्याने द कपिल शर्मा शो मध्ये सांगितले की, आमची आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची होती. आम्ही चाळीतील एका छोट्याशा घरात राहात होतो. मी कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी एका ट्रॅव्हल एजन्सीमध्ये काम करत होतो. मी बसने नोकरीला जायचो. त्यावेळी एका व्यक्तीने मला बस स्टॉपवर पाहिले आणि मला मॉडलिंग करायला आवडेल का असे विचारले. या दिवसाने माझे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले.
जॅकी श्रॉफने काही महिन्यांपूर्वी एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत देखील त्यांच्या चाळीतील दिवसांविषयी सांगितले होते. तो म्हणाला होता की, मी आजही तीन बत्तीतील माझ्या चाळीतील घरी अनेकवेळा जातो. मी तिथे बरेच वर्षं राहिलेलो आहे. हिरो बनल्यानंतरही काही वर्षं माझा मुक्काम त्याच घरात होता. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण मी अभिनेता बनल्यानंतरही टॉयलेटला जाण्यासाठी डब्बा पकडून लाईनमध्ये उभा रहायचो. आमच्या चाळीत अनेक कुटुंब असल्याने टॉयलेटला नेहमीच लाईन असायची. तसेच टॉयलेट माझ्या घरापासून दूर असल्याने लोकांच्या दारासमोरून मला जावे लागत असे.