'कोई मिल गया'मधील जादूचं दयाबेनसोबत आहे हे खास कनेक्शन, या अभिनेत्याने साकारली होती ही भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 01:23 PM2023-08-08T13:23:56+5:302023-08-08T13:24:29+5:30
हृतिक रोशन(Hritik Roshan)चा चित्रपट 'कोई मिल गया' (Koi Mil Gaya) इतक्या वर्षांनंतर पुन्हा चर्चेत आला आहे. ८ ऑगस्टला या चित्रपटाला २० वर्ष पूर्ण झाली आहेत.
हृतिक रोशन(Hritik Roshan)चा चित्रपट 'कोई मिल गया' (Koi Mil Gaya) इतक्या वर्षांनंतर पुन्हा चर्चेत आला आहे. ८ ऑगस्टला या चित्रपटाला २० वर्ष पूर्ण झाली आहेत. या चित्रपटातील इंटरेस्टिंग आणि महत्त्वाची भूमिका होती ती एलियन जादूची. ज्याच्या येण्यामुळे हृतिक रोशनने साकारलेल्या रोहन मेहराच्या आयुष्याला कलाटणी मिळते. २००३ साली रिलीज झालेल्या या चित्रपटातून लहान मुलांना एका वेगळ्या जगाची सफर करायला मिळाली. या चित्रपटाला लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचेच खूप प्रेम मिळाले. या चित्रपटातील एलियनच्या कंसेप्टला खूप पसंती मिळाली. पण तुम्हाला माहित आहे का, यात जादूची भूमिका कोणत्या अभिनेत्याने साकारली होती?
टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय दिवंगत अभिनेते इंद्रवदन पुरोहित (Indravadan Purohit) यांनी कोई मिल गया सिनेमातील जादूची भूमिका केली होती. या चित्रपटातील त्यांचे कास्टिंग खास कारणामुळे झाले होते. खरेतर इंद्रवदन पुरोहित यांची उंची ३ फूट होती आणि यामुळेच त्यांची जादूच्या भूमिकेसाठी निवड झाली. जादूसाठीचे कॉश्च्युम परदेशातून आले होते. चित्रपट निर्मात्यांनी ऑस्ट्रेलियात जादूचे कॉश्च्युम बनवले होते आणि ते बनण्यासाठी जवळपास १ वर्ष लागला होता. कॉश्च्युममध्ये असलेले डोळे माणूस आणि प्राण्यांपासून प्रभावित होऊन बनवले होते. या कॉश्च्युमची किंमत जवळपास १ कोटी होती.
इंद्रवदन पुरोहित यांना जादूची भूमिका साकारण्यासाठी खूप अडचणींचा सामना करावा लागला होता. या कॉश्च्युममध्ये फिट होण्यासाठी त्यांना आधी वजन घटवावे लागले होते. तरीदेखील अडचणी संपल्या नाहीत. कॉश्च्युम भारी असल्यामुळे त्यांना कपड्यात श्वास घेताना त्रास झाला होता.
इंद्रवदन पुरोहित टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेते आहेत. त्यांनी बालवीरमध्ये डूबा डूबाची भूमिका केली होती. तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेत दयाबेनच्या दूरच्या नातेवाईकाची भूमिका केली होती. २८ सप्टेंबर, २०१४ मध्ये त्यांनी जगाचा निरोप घेतला.