जगजीत सिंह पडले होते विवाहित महिलेच्या प्रेमात, लग्नासाठी थेट पतीकडेच घातली होती मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 01:52 PM2021-02-08T13:52:25+5:302021-02-08T13:53:12+5:30

मुंबईत आल्यानंतर काहीच महिन्यांनंतर चित्रा दत्ता या बंगाली मुलीसोबत जगजीत सिंह यांची ओळख झाली. चित्रा या विवाहित होत्या.

jagjit singh and wife chitra singh love story | जगजीत सिंह पडले होते विवाहित महिलेच्या प्रेमात, लग्नासाठी थेट पतीकडेच घातली होती मागणी

जगजीत सिंह पडले होते विवाहित महिलेच्या प्रेमात, लग्नासाठी थेट पतीकडेच घातली होती मागणी

googlenewsNext
ठळक मुद्देचित्रा यांचे पती देबू प्रसाद दत्ता ब्रिटानिया बिस्कीट कंपनीत एका मोठ्या पदावर होते. देबू प्रसाद यांना साऊंड रेकॉर्डिंगमध्ये प्रचंड रस होता. त्यामुळे त्यांनी घरातच एक रेकॉर्डिंग स्टुडिओ बनवला होता. एका रेकॉर्डिंगदरम्यान जगजीत आणि चित्रा यांची ओळख झाली.

गझल सम्राट जगजीत सिंह यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. त्यांनी एकाहून सरस गाणी गायलेली आहेत. त्यांनी गायलेल्या अनेक अजरामर गीतं आजही आपल्या मनात जिवंत आहेत. आजच्याच दिवशी म्हणजे ८ फेब्रुवारी १९४१ ला राजस्थानच्या बिकानेर येथे त्यांचा जन्म झाला होता. त्यांचे खरे नाव जगजीवन सिंह असे होते. जगजीत यांनी इंजिनिअर बनावे, अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. पण जगजीत यांना संगीतात रस होता. पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर जगजीत यांनी ऑल इंडिया रेडिओच्या जालंधर विभागात गायक आणि संगीत दिग्दर्शक म्हणून काम करायला सुरुवात केली. याचदरम्यान गुरुद्वारात पंडित छगनलाल मिश्रा आणि उस्ताद जमाल खान यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे धडे घ्यायला सुरुवात केली.

जालंधरमध्ये जगजीत सिंह नोकरी करत असले तरी त्यांच्या डोक्यात त्यावेळी काहीतरी वेगळेच सुरू होते. मार्च १९६५ मध्ये जगजीत सिंह कुणालाही न सांगता मुंबईला पळून गेले. येथे त्यांच्या वाट्याला प्रचंड संघर्ष आला. पण याच मुंबईत त्यांना त्यांचे प्रेम मिळाले. मुंबईत आल्यानंतर काहीच महिन्यांनंतर चित्रा दत्ता या बंगाली मुलीसोबत त्यांची ओळख झाली. चित्रा या विवाहित होत्या. चित्रा यांचे पती देबू प्रसाद दत्ता ब्रिटानिया बिस्कीट कंपनीत एका मोठ्या पदावर होते. देबू प्रसाद यांना साऊंड रेकॉर्डिंगमध्ये प्रचंड रस होता. त्यामुळे त्यांनी घरातच एक रेकॉर्डिंग स्टुडिओ बनवला होता. एका रेकॉर्डिंगदरम्यान जगजीत आणि चित्रा यांची ओळख झाली आणि दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. पण काहीच वर्षांत या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. जगजीत यांना चित्रा यांच्यासोबत लग्न करायचे होते. पण त्यांचे लग्न झाले असल्यामुळे काय करायचे हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. पण त्यांनी थेट चित्रा यांच्या पतीकडे जाऊन त्यांचा हात मागितला होता. पुढे चित्रा आणि देबू प्रसाद यांचा घटस्फोट झाला आणि १९६९ मध्ये चित्रा आणि जगजीत यांचे लग्न झाले. चित्रा व जगजीत यांनी अनेक गाणी एकत्र गायलीत.

जगजीत आणि चित्रा यांना एक मुलगा होता. पण त्यांचा मुलगा विवेक १८ वर्षांचा असताना एका अपघातात त्याचा मृत्यू झाला. तरुण मुलाच्या मृत्यूचा धक्का चित्रा यांना सहन झाला नाही. यानंतर त्यांनी गाणे कायमचे सोडले. या घटनेने जगजीत यांनाही हादरवून सोडले. 

२०११मध्ये जगजीत सिंह हे गुलाम अली यांच्यासोबत युकेमध्ये परफॉर्म करणार होते. मात्र त्याआधी त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती अचानक गंभीर झाली आणि ते कोमात गेलेत. १० ऑक्टोबर २०११ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Web Title: jagjit singh and wife chitra singh love story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.