Adipurush: “जय श्री राम…” 'आदिपुरुष'मधील पहिलं गाणं पाहून प्रेक्षक भारावले; नेटकरी म्हणाले, 'अंगावर शहारे आले..'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2023 04:52 PM2023-05-20T16:52:18+5:302023-05-20T16:58:58+5:30
आदिपुरुष चित्रपटातील 'जय श्री राम' हे गाणं २ मिनिटे ऐकल्यावर अंगावर शहारे येतात, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.
प्रभास (Prabhas), क्रिती सनॉन (Kriti Sanon) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) यांच्या 'आदिपुरुष' (Adipurush) या चित्रपटाच्या प्रदर्शनाची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट पुढील महिन्यात १६ जून रोजी प्रदर्शित होत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर देखील रिलीज झाला. त्यानंतर अनेकांनी या ट्रेलरचं कौतुक केलं आहे. आता आदिपुरुष चित्रपटातील जय श्री राम (Jai Shri Ram Song) हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. या गाण्याला देखील नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.
अजय-अतुलच्या संगीताने पुन्हा एकदा सर्वांचे मन जिंकले आहे. तसेच मनोज मुंतशिर शुक्ला हे या गाण्याचे गीतकार आहेत. जवळपास २ मिनिटे ३९ सेकंदांचे हे पूर्ण गाणे ऐकल्यावर अंगावर शहारे येतात, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. या गाण्याला हिंदी आणि तेलुगू भाषेत रिलीज करण्यात आलं आहे.
मुंबईमध्ये अनोख्या पद्धतीने पहिले गाणे रिलीज करता यावे यासाठी ‘आदिपुरुष’च्या टीमने विशेष तयारी केली होती. दिग्दर्शक ओम राऊत, भूषण कुमार यांच्याबरोबर अजय-अतुल यांनी मोठ्या भक्तिभावाने ‘जय श्री राम’ गाणे बनवले आहे, असे या कार्यक्रमादरम्यान सांगण्यात आले.
यानंतर प्रभासनं जय श्री राम हे गाणं रिलीज झाल्यानंतर एक ट्वीट शेअर केले. या ट्वीटमध्ये त्यानं लिहिलं, जय श्री राम गाणं कसं वाटलं? जय श्री राम या टॅगचा वापर करुन रिप्लाय द्या' प्रभासच्या या ट्वीटला एका नेटकऱ्यानं रिप्लाय दिला,'गाणं ऐकल्यानंतर अंगावर शहारे आले.' तर दुसऱ्या युझरनं युट्यूबवर शेअर करण्यात आलेल्या गाण्याला कमेंट केली, 'हे केवळ गाणं नाहीये, या भावना आहेत. '
या चित्रपटात प्रभास प्रभू रामाच्या भूमिकेत, क्रिती माता सीतेच्या भूमिकेत आणि सनी सिंग लक्ष्मणच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर सैफ अली खान लंकापती रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. 'आदिपुरुष' या चित्रपटात मराठमोळा देवदत्त नागे (Devdatta Nage) हा हनुमानाची भूमिका साकारत आहे. प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकेतेने वाट बघत आहेत. हा चित्रपट प्रेक्षकांना 3D मध्ये पाहता येणार आहे.